पिरंगुट : मार्चपर्यंत काम न झाल्यास रोडवेज ब्लॅकलिस्ट | पुढारी

पिरंगुट : मार्चपर्यंत काम न झाल्यास रोडवेज ब्लॅकलिस्ट

पिरंगुट; पुढारी वृत्तसेवा : गेले तीन वर्षांपासून रेंगाळलेल्या कोलाड महामार्गाचे काम अखेर सुरू झाले आहे. त्यामध्ये आता उशिरा का होईना, पण आमदार संग्राम थोपटे ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये आले आहेत. बुधवारी (दि. 18) सकाळी जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपेलवार यांच्या कार्यालयात याबाबत त्यांनी बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत महामार्गाचे काम करणार्‍या रोडवेज सोल्यूशन कंपनीला वेळेत काम पूर्ण न केल्यास ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याचा, तर रस्ते विकास महामंडळाच्या बैठकीत मार्चअखेर पिरंगुटसह सर्व ‘ब्लॅक स्पॉट’ पूर्ण करून घेण्याचा निर्णय झाला.

नवीन प्रशासकीय इमारतीत झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ पदाधिकारी, प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार अभय चव्हाण, मुळशी काँग्रेसचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, शरद शेंडे आदी उपस्थित होते. रोडवेज कंपनीचा प्रतिनिधी बैठकीला उपस्थित नसल्याने ठेकेदार अमित गडाख यांना व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपेलवार यांनी फोन केला.

आमदार थोपटे देखील त्यात सहभागी झाले. ठेकेदार अमित गोडख यांनी पिरंगुट, लवळेफाटासह कासारअंबोली ते अंबडवेट रस्ता त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत भूगाव, पौड बाह्यवळण रस्त्याचे काम, तसेच जामगाव ते माले यामधील 700 मीटर लांबीचे काम त्वरित पूर्ण करण्याबाबत निर्णय झाला.

उद्या मोर्चा
कोलाड हायवेचे काम रेंगाळले आहे म्हणून मुळशी तालुक्यातील संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी (दि. 19) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

Back to top button