पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध की लढत? | पुढारी

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध की लढत?

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी पुढील महिन्यात 27 तारखेला मतदान होणार आहे. दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यामुळे चिंचवड मतदारसंघ भाजप आपल्याकडे राखणार, असे चित्र सध्या दिसत आहे. असे असले तरी, विरोधक लढत बिनविरोध करणार की सामना करणार, याची उत्सुकता आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारीला कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. ती जागा रिक्त झाल्याने चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. दिवंगत आ. जगताप यांचे नेतृत्व संपूर्ण शहरासाठी स्वीकारार्ह होते. तसेच, महापालिका प्रशासनावर त्यांची मोठी पकड होती. पडत्या काळात शहरात भाजपला उभारी देण्याचे काम जगतापांनी केले. जगतापांसारखे नेतृत्व भविष्यात कायम राहावे, यासाठी ही पोटनिवडणूक शहरातील राजकीय पटलावर महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

आ. जगताप यांच्या मृत्यूनंतर 15 दिवसांतच निवडणूक लागल्याने सहानुभूतीच्या लाटेवर भाजप चिंचवडचा मतदारसंघ आपल्याकडेच राखणार, असे सध्याचे चित्र आहे. राज्यात शिवसेना (शिंदे गट) व भाजपचे सरकार असल्याने निवडणुकीत भाजपसह शिवसेनेची तसेच, भाजपचे शहराध्यक्ष आ. महेश लांडगे आणि शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार श्रीरंग बारणे यांचीही ताकद मिळणार आहे. या विजयामुळे आगामी महापालिका निवडणूक भाजपला अधिक सुलभ होणार आहे. कुंंपणावरील विरोधातील माजी नगरसेवक भाजपकडे मोठ्या संख्येने वळतील. परिणामी, भाजपची शहरातील ताकद वाढण्यास हा विजय सहायभूत ठरणार आहे.

विरोधक निवडणूक लढणार की बिनविरोध करायची याबाबत निर्णय पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशावर अंवलबून आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील रणनीती ठरवली जाईल, असे विरोधकांनी स्पष्ट केले आहे. विरोधकांच्या भूमिकेवरून या निवडणुकीचे चित्र ठरणार आहे.

पदाधिकारी, कार्यकर्त्यांत उत्साह

वर्षभरापासून रखडलेल्या महापालिका निवडणुकीमुळे सर्वच पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे. त्यामुळे सत्ताधार्‍यांसह विरोधकांचे मोर्चे, आंदोलने लक्षवेधी ठरत नाहीत. तसेच, आरोप-प्रत्यारोपही थंडावले आहेत. या मरगळलेल्या वातावरणात विधानसभा पोटनिवडणुकीच्या घोषणेमुळे राजकीय पक्षात उत्साह आहे. या पोटनिवडणुकीपाठोपाठ पालिका निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे इच्छुक पोटनिवडणुकीत आपला प्रभागावर लक्ष देण्यावर भर देतील, असा अंदाज आहे.

संभाव्य उमेदवार

दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप हे कर्करोगामुळे आजारी असल्यापासून त्यांचे बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी चिंचवड मतदारसंघाच्या भाजप प्रचारप्रमुख म्हणून काम सांभाळले आहे. आ. जगताप यांची उणीव भरून काढण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे भाजपकडून त्यांची उमेदवारी अंतिम समजली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे तसेच, शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे हे उमेदवारीचे प्रमुख दावेदार असतील.

चिंचवड हा सर्वांत मोठा मतदारसंघ
पुणे जिल्ह्यात चिंचवड मतदारसंघ हा सर्वांधिक मतदारसंख्या असलेला मतदारसंघ आहे. मतदारसंघात 5 लाख 66 हजार 415 मतदार आहेत. सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी, थेरगाव, काळेवाडी, चिंचवड, वाल्हेकरवाडी, वाकड, भूमकर वस्ती, आकुर्डी, रावेत, किवळे, ताथवडे या भागांचा समावेश आहे.

आयुक्तांना धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत
पालिका 12 मार्च 2022 ला बरखास्त झाल्याने 13 मार्चपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. आयुक्त हे प्रशासक म्हणून पालिकेचे कामकाज पाहत आहेत. त्यामुळे तेच स्थायी समिती, सर्वसाधारण सभा व इतर समितीचे निर्णय घेत आहेत. आचारसंहिता लागू झाल्याने आयुक्तांनी 2 मार्च 2023 पर्यंत धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. त्यामुळे सभा आयोजित केल्या जाणार नाहीत. तसेच, नागरिकांसाठी सुरू केलेली जनसंवाद सभेलाही ब्रेक लागणार आहे.

 

Back to top button