वेल्हे : निवडणुकीच्या वादातून आंब्याची झाडे तोडली | पुढारी

वेल्हे : निवडणुकीच्या वादातून आंब्याची झाडे तोडली

वेल्हे(ता. वेल्हे); पुढारी वृत्त सेवा : पानशेत धरण खोर्‍यातील आंबेगाव खुर्द येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून उपसरपंच राजू बबन कडू यांची आंब्याची झाडे तोडण्यात आली, तसेच गवताच्या गंजीला आग लावण्यात आली. याबाबत वेल्हे पोलिस ठाण्याच्या पानशेत पोलिस चौकीत अज्ञात व्यक्ती विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपसरपंच राजू बबन कडू यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी तसेच वेल्हे तालुका तहसीलदार व वेल्हे पोलिसांना निवेदन दिले आहे. याबाबत आपण तक्रार दाखल केली आहे. मात्र, समाजकंटक गावात राजरोसपणे फिरत आहे. त्यांच्यापासून मला व ग्रामस्थांच्या जिवाला धोका आहे, असेदेखील कडू यांचे म्हणणे आहे.

निवडणुकीच्या काळापासून येथे राजकीय वाद सुरू आहेत. काही समाजकंटकांनी उपसरपंच कडू यांच्या मालकीच्या शेतातील फळाला आलेली 62 कलमी आंब्याची झाडे तोडून नुकसान केले. तसेच दोन हजार पेंढ्यांची गवताची गंज जाळली. संपत्तीचे नुकसान करून मानसिक त्रासही दिला जात आहे, असे कडू यांनी निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, याबाबत पानशेत पोलिस चौकीचे अंमलदार अजय शिंदे म्हणाले, उपसरपंच कडू यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सखोल तपास सुरू आहे.

Back to top button