बिबट्याच्या हल्ल्यात बोकडाचा मृत्यू; निरगुडसर गावात आता बिबट्याचा प्रवेश | पुढारी

बिबट्याच्या हल्ल्यात बोकडाचा मृत्यू; निरगुडसर गावात आता बिबट्याचा प्रवेश

मंचर(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : निरगुडसरच्या  गावठाण येथील उमेश सोलंकी यांच्या गोठ्यात असलेल्या बोकडावर बिबट्याने हल्ला करीत त्याला ठार केले. बिबट्याने गावातच प्रवेश केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. निरगुडसर येथे मुख्य गावठाणात नदीच्या बाजूला काही अंतरावर उमेश सोलंकी राहतात.

त्यांच्या घरामागे छोटासा गोठा असून, त्यामध्ये म्हैस, बोकड, गायी असतात. दरम्यान, त्यांना घरामागे कुंत्री भुंकण्याचा आवाज आला. त्या वेळी त्यांनी गोठ्यात जाऊन पाहिले असता त्यांना गोठ्यात बोकड दिसला नाही. त्यांनी शोधाशोध केली असता बिबट्याने बोकडाला ठार केले होते व काही अंतरावर बिबट्या पळताना दिसला. सोलंकी यांचा बोकड ठार झाल्याने त्यांचे अंदाजे 10 हजारांचे नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती कळताच वनमजूर दशरथ मेंगडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या परिसरात गावठाण रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या महावितरणच्या खांबांवरील विजेचे दिवे बंद असल्याने सर्वत्र अंधार पसरला आहे.

त्यामुळे अंधाराचा फायदा घेत बिबट्या वस्तीत घुसल्याचे प्रकार वाढत आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने खांबांवर असणारे विद्युत दिवे सुरू करावेत, अशी मागणी स्थानिक नागरिक रवी पवार, सचिन जाधव, चंद्रकांत गायकवाड, उमेश सोलंकी यांनी केली आहे.

Back to top button