पुणे : तीन महिने रेकी करून साधला डाव; वेशांतर करून बीड, जालन्यातून ठोकल्या बेड्या

पुणे : तीन महिने रेकी करून साधला डाव; वेशांतर करून बीड, जालन्यातून ठोकल्या बेड्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा : तीन महिने रेकी करून भरदिवसा घरफोडी करणार्‍या टोळीला चतुःशृंगी पोलिसांनी बीड व जालना जिल्ह्यातून अटक केली. चोरीचे दागिने विकत घेणार्‍या ठाण्यातील दोन सराफांनाही बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल आठ दिवस पोलिस वेशांतर करून आरोपींच्या मागावर होते. खुशबू दिलीप गुप्ता ऊर्फ खुशबू कठाळू काळे (वय 19, रा. घनसांगवी, जि. जालना), अनु पवन आव्हाड ऊर्फ अनु राहुल भोसले (रा. पारधीवस्ती, राजापूर फाटा, ता. गेवराई, जि. बीड) अशी आरोपींची नावे आहेत. एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे. घरफोडी करणार्‍या टोळीतील सर्व आरोपी महिला आहेत. त्याच्यांकडून चोरी केलेल्या मुद्देमालापैकी 43 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

घरातील व्यक्ती जेवणासाठी बाहेर गेल्यानंतर अवघ्या अडीच तासांत चोरट्यांनी व्यावसायिकाचे घर साफ करून तब्बल 66 लाख 42 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला होता. त्यामध्ये 205 तोळे सोने, चार तोळे हिर्‍याचे दागिने, चांदी, प्लॅटिनमचे दागिने, रोकड आणि विदेशी चलनाचा समावेश होता. ही घटना भरदिवसा बाणेर रोड-औंध येथील अनामिका बंगला क्रमांक 17, सिंध हौसिंग सोसायटीत रविवारी घडली होती. याप्रकरणी 55 वर्षीय व्यावसायिकाने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

त्यानुसार पोलिस दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत होते. परिसरातील सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला असता, ही घरफोडी महिलांच्या टोळीने केली असून, ते बीड व जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजले. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडिक आणि त्यांच्या पथकाने थेट बीड जिल्हा गाठला. तेथे गेल्यानंतर अनु हिची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तब्बल आठ दिवस वेशांतर करून माळरानावरील वस्तीवर फिरून तिला ताब्यात घेतले. तिच्याकडे केलेल्या चौकशीत खुशबूचे नाव समोर आले.

त्यानंतर पथकाने जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथून तिला ताब्यात घेतले. पोलिस आल्याची चाहूल लागताच तिने घर सोडून शेतात पलायन केले होते. शेवटी पथकाने तिला पाठलाग करून पकडले. दोघींच्या चौकशीत त्यांनी चोरी केलेल्या काही ऐवजापैकी इतर ऐवज ठाणे येथील सराफाला विक्री केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी महावीर धनराज चपलोत (वय 35, कोपरी कॉलनी, ठाणे (पूर्व), मदन रामेश्वर वैष्णव (वय 26, रा. शिवाजीनगर, कळवा, ठाणे) या दोघा सराफांना अटक केली. टोळीतील इतर दोन महिला फरार असून, त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.

ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, गुन्हे निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रूपेश चाळके, नीलेशकुमार महाडीक, कर्मचारी बाबूलाल तांदळे, तेजेस चोपडे, श्रीकांत वाघवले, सुधाकर माने, ज्ञानेश्वर मुळे, इरफान मोमीन, बाळासाहेब दांगडे, किशोर दुशिंग यांच्या पथकाने केली.

व्यावसायिकाच्या घरी पाण्याचा बहाणा
सिंध सोसायटीतील ज्या व्यावसायिकाच्या घरी चोरी झाली, त्या बंगल्याची टोळीने एक नव्हे, दोन नव्हे; तर तब्बल तीन महिने रेकी केली. रेकी करण्याची जबाबदारी एका महिलेवर होती. पाणी पिण्याच्या बहाण्याने ती त्या बंगल्याभोवती फिरत होती. पाण्यावरून जेवणावर आली. मात्र, व्यावसायिकाच्या हे लक्षात आले नाही. तीन महिने ती या घरातील व्यक्ती कधी बाहेर जातात, कधी परत येतात, हे पाहत होती. अनु हिने हे काम केले. तिच्या असे निदर्शनास आले की, प्रत्येक रविवारी या घरातील व्यक्ती दुपारी बाहेर जातात. त्याच संधीची वाट पाहत एके दिवशी रविवारी दुपारी घर साफ करून पळ काढला

दीडशे ते दोनशे सीसीटीव्ही कॅमेरे आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे चोरट्यांचा माग काढला. बीड आणि जालन्यातून दोन महिलांना अटक केली आहे. त्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. ठाण्यातील दोन सराफांनाही अटक केली आहे. बंगल्याच्या खिडकीतून प्रवेश करून ही चोरी करण्यात आली होती.
                                                               बालाजी पांढरे,
                                              वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चतुःशृंगी

logo
Pudhari News
pudhari.news