मेट्रोचे सर्वांत खोल भुयारी स्थानक पुण्यात! | पुढारी

मेट्रोचे सर्वांत खोल भुयारी स्थानक पुण्यात!

पुणे : दोन्ही मेट्रो मार्ग एका ठिकाणी येणार्‍या शिवाजीनगर येथील न्यायालयालगतच्या सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. येत्या महिन्यात स्थानक पूर्ण होत असून, फेब्रुवारीअखेरीस त्याची केंद्रीय विभागाकडून तपासणी केली जाईल. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून स्वारगेटकडे जाणार्‍या मेट्रो मार्गाचे भुयारी स्थानक येथे आहे. हे स्थानक देशातील सर्वांत खोल म्हणजे जमिनीखाली 33.1 मीटर (108.5 फूट) आहे.

त्यानंतर हा मेट्रो भुयारी मार्ग नदीखालून पुढे कसबा पेठेकडे जातो. वनाज ते रामवाडी हा उन्नत मार्ग जमिनीपासून 14 मीटर उंच आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी ही माहिती मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. प्रवाशांना या स्थानकावरून चारही दिशेला जाता येणार असल्यामुळे येथे प्रवाशांची मेट्रोतील चढउतार मोठ्या प्रमाणात होईल.

दोन मेट्रो मार्गांतील उंचीचे अंतर सुमारे बारा मजली आहे. तरीदेखील कमीत कमी वेळेत लोकांना ये-जा करता येईल. त्याचबरोबर हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो मार्गही या इंटरचेंज स्थानकाजवळ आहे. दोन वर्षांत त्या मार्गाचे काम पूर्ण होईल. तेथून सुमारे 170 मीटर अंतराचा स्कायवॉक बांधण्यात येणार असून, त्यावरून या दोन्ही मार्गांपाशी प्रवाशांना पोहचता येईल.

या स्थानकाचा परिसर 11.17 एकर आहे. तेथे येण्या-जाण्यासाठी सात प्रवेशद्वार आहेत. भूमिगत स्थानकाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथून 95 फूट उंचीवर छत असून, तेथून सूर्यप्रकाश किंवा नैसर्गिक प्रकाश स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर पडेल. प्रवाशांच्या सोयीसाठी आठ लिफ्ट आणि 18 एस्किलेटर बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर स्थानकात पीएमपी गाड्यांसाठी मोठा थांबा बांधण्यात येणार आहे.

Back to top button