पुणे : आचारसंहितेमुळे महापालिकेचे अंदाजपत्रक लांबण्याची शक्यता | पुढारी

पुणे : आचारसंहितेमुळे महापालिकेचे अंदाजपत्रक लांबण्याची शक्यता

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेचे 2023-24 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आणखी लांबण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार महापालिकेचे महसुली, भांडवली उत्पन्न आणि खर्चाचे अंदाजपत्रक (आराखडा) दरवर्षी प्रशासनाकडून तयार केले जाते. साधारणपणे नोव्हेंबर महिन्यापासून प्रशासनाकडून अंदाजपत्रकाचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रशासनाच्या विभागवार बैठका झाल्या.

हा आराखडा 15 जानेवारीपर्यंत सादर होणे अपेक्षित होते. मात्र, चालू महिन्यात शहरात जी- 20 परिषद होती. त्यामुळे संपूर्ण प्रशासन त्याबाबत तयारी करण्यात गुंतले होते. त्यामुळे अंदाजपत्रकाचा आराखडा वेळेत तयार होऊ शकला नाही. त्यातच आता कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुन्हा अंदाजपत्रक सादर करण्याचा मुहूर्त लांबणार असल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.

आचारसंहिता कसब्यापुरतीच
आमदार टिळक यांच्या निधनाने कसबा विधनासभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान असून 2 मार्च रोजी निकाल आहे. या निवडणुकीची आचारसंहिता कसबा मतदारसंघात लागू झाली असून, 4 मार्च रोजी आचारसंहिता संपणार आहे.
                                                  – विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

Back to top button