उजनीतून तातडीने जलवाहतूक सुरू करा

उजनीतून तातडीने जलवाहतूक सुरू करा
Published on
Updated on

भिगवण : पुढारी वृत्तसेवा : बि—टिशकालीन डिकसळ पूल धोकादायक बनल्याने प्रशासनाने पुलावरील वाहतूक बंद केल्याने पुनर्वसित गावातील रुग्ण, शालेय विद्यार्थी व नागरिकांचे अतोनात हाल सुरू झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीची उपाययोजना म्हणून जलवाहतूक सुरू करावी, अशी मागणी आता सोलापूर व पुणे जिल्ह्यातील ग्रामस्थांकडून होत आहे.

याबाबत टाकळी येथील ग्रामसदस्य नितीन इरचे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग जगताप तसेच राहुल नगरे, भरत माने आदींनी ही मागणी केली आहे.  पूल बंद केल्याने दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. सोमवारी (दि. 16) रात्री एका रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल कमी झाली होती. त्यास भिगवणकडे आणणे अत्यावश्यक होते. मात्र, त्याला राशीनकडे पाठवावे लागले. सुदैवाने त्या रुग्णाचे प्राण वाचले आहेत, असे त्यांनी सांगितले आहे. पूल बंद केला असला तरी त्यावर उपाययोजना आखणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करत किमान तातडीने जलवाहतूक सुरू करावी किंवा स्थानिक लोकांच्या वाहतूक बोटीला तत्काळ परवानगी द्यावी, असे मत अ‍ॅड. जगताप व इरचे यांनी व्यक्त केले.

शेतकर्‍यांपासून मच्छिमारांच्या मालवाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, शालेय विद्यार्थ्यांचे कमालीचे हाल होऊ लागले आहेत. रुग्णाला वेळेत उपचार न मिळाल्यास तो दगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व बाबींचा विचार करून तातडीने जलवाहतूक सुरू करावी तसेच स्थानिक बोट वाहतुकीला आपत्ती काळातील मदत म्हणून तात्पुरती परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करून पुणे व सोलापूरचे जिल्हाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांनाही माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दंडुकेशाही नको
दरम्यान पुलावरील वाहतूक बंद करण्यासाठी पुणे व सोलापूर बाजूने अडथळे निर्माण करण्यात आले आहेत. यातून हतबल झालेल्या एका वाहनचालकाने रस्ता काढण्याचा प्रयत्न केला असता, करमाळा पोलिसांनी संबधित चालकाची कुटुंबासमोर यथेच्छ धुलाई केली. नागरिकांना मारहाण न करता त्यांना व्यवस्थित व संभाव्य धोक्याची माहिती देऊन पुलावरून जाण्यास परावृत्त करावे, मात्र त्यांना मारहाण करू नये, अशीही मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news