पुणे : मित्रांनीच केला युवकाचा खून | पुढारी

पुणे : मित्रांनीच केला युवकाचा खून

मंचर : पुढारी वृत्तसेवा : फंडातील पैशांच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून धमकी देऊन मित्रांनीच मित्राचा खून केल्याची खळबळजनक घटना आंबेगाव तालुक्यातील कानसे येथे घडली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी मंगळवारी (दि. 17) दिली. सागर रखमा आमोंडकर (वय 32, रा. कानसे, ता. आंबेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याचे रविवारी (दि. 15) राहत्या घरातून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा खून करून त्याचा मृतदेह कालव्याच्या बाजूला टाकण्यात आला होता. याबाबतची फिर्याद सागर आमोंडकरचे वडील रखमा जयराम आमोंडकर यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात दिली होती.

घोडेगाव पोलिसांनी यातील संशयित रोहन उर्फ सोन्या एकनाथ बो-हाडे (वय 21, रा. माळवाडी कानसे, ता. आंबेगाव), अमित उर्फ गंग्या अरुण सोनवणे (वय 26, रा. गंगापूर खुर्द, ता. आंबेगाव) आणि अक्षय उर्फ सोन्या अनंत येवले (वय 28, रा. गंगापूर खुर्द, ता. आंबेगाव) यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांनी सांगितले की, गावपातळीवर शेतकऱ्यांसाठी छोट्या प्रमाणात फंड जमा करून तो वेळप्रसंगी वापरण्यात येतो. या फंडातील पैशाच्या देवाणघेवाणीवरून त्यांचा सागरशी वाद झाला. या वादातूनच त्यांनी सागर याचा खून करून त्याचा मृतदेह फेकून दिल्याचे कबूल केले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने करीत आहेत.

Back to top button