इंदापूर : अवैध धंदे बंदसाठी महिला सरसावल्या | पुढारी

इंदापूर : अवैध धंदे बंदसाठी महिला सरसावल्या

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा :  लाखेवाडी (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री व जुगाराचे अड्डे सुरू आहेत. लाखेवाडीतील महिला याविरोधात एकवटल्या. शेकडो महिलांनी ग्रामसभेत अवैध धंदे बंद करण्याचा ठराव मंजूर केला. विशेष म्हणजे कोणत्याही महिलेकडून विरोध झाला नाही. यावेळी इंदापूर पोलिस आणि तहसील विभागालाही याचे निवेदन देण्यात आले आहे.

चित्रलेखा ढोले या नुकत्याच गावच्या सरपंच म्हणून जनतेतून निवडून आल्या आहेत. गावच्या कारभाराची सूत्रे हाती घेताच ढोले यांनी एका विधायक कामाने आपल्या कर्तव्याची सुरुवात केली आहे. गावात चालू असणारे दारू- ताडी विक्री, जुगार यामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले असल्याने ढोले यांनी असे अवैध धंदे चालवणार्‍यांना चाप बसवून त्यांचा पुरता बंदोबस्त करण्यासाठी मोहीम आखली आहे. लाखेवाडी या गावामध्ये अवैध दारू, ताडी विक्री करणारी 12 ते 15 दुकाने असून जुगार खेळणारे दोन- तीन अड्डे आहेत. दारूमुळे गावामध्ये अशांतता, मारामारीच्या घटना घडत आहेत.

कुटुंबातील स्त्रियांचा छळ होत आहे. दारू पिऊन वाहन चालवल्याने अपघात घडणे, शेजारी राहणार्‍यांना त्रास देणे, अशा गोष्टी घडत असल्याने दारू बंदी होणे आवश्यक आहे. यासाठी 13 जानेवारी रोजी सरपंच चित्रलेखा ढोले यांच्या अध्यक्षतेखाली महिलांची विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती. या सभेत ग्रामपंचायत हद्दीतील सुरू असलेले दारू, मटका यासारखे अवैध धंदे मोडून काढण्यासाठी एकमताने ठराव मंजूर  करण्यात आला.

सबंधित ठरावाची प्रत आणि सरपंच व ग्रामसेवकांच्या स्वाक्षरीचे लेखी निवेदन अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, इंदापूर पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांसह तहसीलदार श्रीकांत पाटील यांना देण्यात आले. त्यामुळे लाखेवाडीत चालणार्‍या या अवैध धंद्यांवर आता पोलिस विभाग कारवाई करणार का ? याकडे सर्वांची नजर लागली आहे.

 

Back to top button