पुणे : ‘टेमघर’च्या दुरुस्तीसाठी 700 कोटी ; राज्यशासनाकडे प्रस्ताव सादर | पुढारी

पुणे : ‘टेमघर’च्या दुरुस्तीसाठी 700 कोटी ; राज्यशासनाकडे प्रस्ताव सादर

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील टेमघर धरणाच्या दुरुस्तीला तब्बल 700 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता लवकरच मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला असून, त्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळणार आहे. हे धरण बांधण्यासाठी 252 कोटी रुपयांचा खर्च आला होता, तर दुरुस्तीसाठी तब्बल 700 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत 500 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आणि एक हजार हेक्टर क्षेत्रफळ सिंचनाखाली आणण्यासाठी मुळशी तालुक्यातील लव्हार्डे येथे टेमघर धरण बांधण्यात आले.

या धरणाची क्षमता 3.71 अब्ज घन फूट (टीएमसी) आहे. टेमघर धरणाचे काम 2010 मध्ये पूर्ण झाले आणि तेव्हापासून धरणात पाणी साठविण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, पाणी साठविण्यास सुरुवात केल्यावर अवघ्या दोन ते तीन वर्षांतच टेमघर धरणाला गळती सुरू झाली. सन 2016 मध्ये धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होऊ लागली. या पाणी गळतीचे प्रमाण प्रतिसेकंद तब्बल 2500 लिटर एवढे होते. टेमघर धरणाच्या कामाला सन 1997 मध्ये सुरुवात झाली होती.

सन 2000 मध्ये या धरणाचे 90 टक्के काम पूर्ण झाले होते. फक्त ग्राऊटिंगचे काम करणे शिल्लक होते. मात्र, त्याच वेळी वनविभाग आणि जलसंपदा विभागामध्ये धरणाच्या जागेवरून वाद होऊन हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतर सन 2010 मध्ये पुन्हा धरणाच्या कामाला परवानगी मिळाली. त्या वेळी ग्राऊटिंगचे काम न करताच धरणामध्ये पाणीसाठा करण्यात आला. परिणामी, काही वर्षांतच हे धरण गळू लागले. दरम्यान, सन 2017 पासून गळतीप्रतिबंधक कामांना सुरुवात झाली असून, धरणाची 90 टक्के गळती रोखण्यात जलसंपदा विभागाला यश मिळाले आहे. मात्र, धरणाच्या मजबुतीसाठी दीर्घकालीन कामे करावी लागणार आहेत. त्याकरिता सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणे आवश्यक आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला असून, त्याला लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळेल.

धरणाच्या दुरुस्तीसाठी आतापर्यंत 500 कोटींचा खर्च करण्यात आला असून, सुप्रमा मिळाल्यानंतर उर्वरित 200 कोटी रुपयांमधून मजबुतीकरणाची कामे करण्यात येणार आहेत, असे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी व्यक्त केला.

‘सुप्रमा’ म्हणजे काय?

शासनाने एखादे काम हाती घेण्यासाठी दिलेली प्रशासकीय मान्यता. या मान्यतेमध्ये प्रामुख्याने कामाचे नाव आणि त्यासाठी किती खर्च करावा लागणार याचा उल्लेख असतो. टेमघर धरणाच्या दुरुस्तीच्या कामाची किंमत वाढल्यामुळे या प्रकल्पासाठी सुप्रमा आवश्यक आहे. मंजूर झालेला मागील सुप्रमा साधारण दहा वर्षापूर्वी मिळाला होता. मात्र, भाववाढ आणि इतर कारणांनी प्रकल्पाची किंमत वाढली असून, मागील सुप्रमामध्ये धरणाच्या दुरुस्तीच्या कामाची तरतूद नव्हती. परिणामी, या धरणाच्या उर्वरित दुरुस्तीच्या कामासाठी सुप्रमा आवश्यक आहे.

Back to top button