पुणे : लसीकरणासाठी मोबाईल व्हॅन | पुढारी

पुणे : लसीकरणासाठी मोबाईल व्हॅन

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गोवर आणि नियमित लसीकरणासाठी मोबाईल व्हॅन सुविधा सुरू करण्यात आली आहे. लसीकरण वाढवण्याच्या उद्देशाने मोबाईल टीमला प्रशिक्षण देण्यात आले आहे. डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य सेवा सहाय्यक कर्मचारी यांच्यासह दोन रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.  अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ मोबाईल व्हॅनचा उद्घाटन सोहळा मंगळवारी पार पडला.

मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांनी मोबाईल टीम कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. उद्घाटनाप्रसंगी लसीकरण अधिकारी तसेच ’जीविका अँड वेलनेस सेंटर’चे प्रतिनिधी उपस्थित होते. बिनवडे म्हणाले, ’गोवरच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेद्वारे तत्काळ कार्यवाही सुरू करण्यात आली. सर्वेक्षणानंतर लसीकरणासाठी ’जीविका हेल्थकेअर’ने मदतीचा हात पुढे केला. पालकांनी बालकांचे लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे.’ डॉ. गणेश जगदाळे यांनी आभार मानले.

Back to top button