पुणे : जिल्हा नियोजन समितीवर तापकीर, कुल | पुढारी

 पुणे : जिल्हा नियोजन समितीवर तापकीर, कुल

 पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने पुणे जिल्हा नियोजन समितीवर 20 सदस्यांची नियुक्ती केल्याची घोषणा मंगळवारी केली. त्यात विधिमंडळ सदस्यांतून दोन, जिल्हा नियोजनच्या कामकाजाचे ज्ञान असलेले चार, तर 14 विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जिल्हा नियोजन समिती बरखास्त करण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होऊनही जिल्हा नियोजन समितीवर सदस्यांची नियुक्ती करण्यात आली नव्हती. त्याचा फटका जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून केल्या जाणार्‍या कामांना बसला.

परिणामी, जिल्हा नियोजन आराखड्यातील कामे टप्प्या-टप्प्यांनी मंजूर करण्यात आली. विधिमंडळ सदस्यांमधून भीमराव तापकीर, राहुल कुल या आमदारांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. जिल्हा नियोजनच्या कामकाजाचे ज्ञान असलेले सदस्य म्हणून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आणि गणेश बीडकर यांची वर्णी लागली आहे. जिल्हा नियोजन समितीमध्ये विशेष निमंत्रित सदस्य म्हणून माजी मंत्री बाळा भेगडे, माजी आमदार योगेश टिळेकर, आशा बुचके, भगवान पोखरकर, वासुदेव काळे, राहुल पाचर्णे, जीवन कोंडे, पांडुरंग कचरे, विजय फुगे, काळूराम नढे, प्रवीण काळभोर, शरद हुलावळे, अलंकार कांचन आणि अमोल पांगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

माजी सभागृह नेते बिडकरांना संधी
जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेल्या सदस्यांमध्ये दोन माजी मंत्री आणि माजी खासदारांबरोबर पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांची निवड करण्यात आली आहे. बिडकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील या दोघांचे निकटचे मानले जातात, त्यामुळे या महत्त्वाच्या समितीत त्यांना संधी मिळाली आहे.

Back to top button