

पुणे, पुढारी ऑनलाईन: सैन्यात सतरा वर्षे देशाची सेवा निवृत्ती नंतर वयाच्या चाळीशीत शेती करता करता स्पर्धा परीक्षेत यश मिळणाऱ्या अक्षय झुरुंगे यांची दौंडमध्ये तालुक्यात जोरदार चर्चा आहे. अक्षय यांनी 40 व्या वर्षी एमपीएससी परीक्षेत यश मिळवलं. ते परिवहन खात्यात अधिकारी झाले आहेत. दौंड तालुक्यातील पाटेठाण गावच्या या माजी सैनिक अक्षय झुरुंगे यांना भेटून खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचा सत्कार केला.
अक्षय झुरुंगे हे परिवहन खात्यात सहायक मोटार वाहन निरीक्षक पदी कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेल अध्यक्ष ज्योती झुरुंगे यांचे ते दीर आहेत. अक्षय झुरुंगे यांनी 17 वर्षे भारतीय लष्करात सेवा केली आहे. सैन्यातून निवृत्त होताना सुभेदार ते पदावर होते. त्यानंतर त्यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवल्याने त्यांची चर्चा होत आहे.
निवृत्त झाल्यावर आपल्या गावी अक्षय झुरुंगे यांनी शेती करण्यास प्रारंभ केला. मात्र त्यांच्यातील असणारा विद्यार्थी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांनी वयाच्या चाळिसाव्या वर्षी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरूवात केली. या शिवाय त्यांना शेतीही करायची होतीच. एकीकडे शेती करता करता त्यांनी जोमाने अभ्यास करत एमपीएससी परीक्षेत यश मिळवत उत्तीर्ण झाले.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे या पाटेठाण येथे गेल्या असता त्यांनी आवर्जून झुरुंगे यांची भेट घेत त्यांचा विशेष सत्कार केला. देश सेवेनंतर पुन्हा जनतेच्या सेवेसाठी वयाच्या चाळिसाव्या वर्षी अभ्यास सुरू करून परीक्षा देणे, त्यात चांगल्या गुणांनी पास होऊन शासकीय सेवा बजावताना जनसेवा करणे या झुरुंगे यांच्या जिद्दीचे खासदार सुळे यांनी भरभरून कौतुक केले. पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या. एवढंच नाही, तर नव्या पिढीने अक्षय झुरुंगे यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी, असेही खासदार सुळे यावेळी म्हणाल्या.