Wow...दगडुशेठ अँड शनिवारवाडा अमेझिंग..! जी २० परिषद होताच पाहुणे भटकंतीवर

पुणे, पुढारी वृत्तसेवा : जी २० परिषदेचा समारोप होताच परिषदेतील विदेशी पाहुण्यांनी पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यास भेट व दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेत शहरात भटकंती केली. दोन्ही ठिकाणे पाहून ‘ वाऊ…. इट्स अमेझींग ‘ असे सहज भाव त्यांच्या तोंडून निघाले. दोन दिवसापासून सुरू असलेल्या जी २० परिषदेचा मंगळवारी (दि. १७) समारोप झाला. या परिषदेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या स्टॉलवर पुण्यातील पर्यटन स्थळांची माहिती मिळाली. अन् पाहुण्यांनी आपला मोर्चा या स्थळांच्या भेटीसाठी वळवला. परिषदेच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या विदेशी पाहुण्यांनी त्यांचे भाव व्यक्त करताना, पुणेकरांचे आदरातिथ्य पाहून आम्ही भारावून तर गेलोच. पण येथील ऐतिहासिक वारसा असलेली पर्यटन स्थळांना पाहून आम्हाला वारंवार यावे असे वाटते, असेही त्यांनी सांगितले. दोन दिवसात आम्ही जे अनुभवले ते आयुष्यभर साठवून ठेवता येण्यासारखे आहे. येथील चवीचे पदार्थ खाल्ल्यानंतर इथेच स्थायिक व्हावे असे वाटते.
फोटो विथ बाप्पा
शनिवारवाड्या लगत असलेल्या लाल महालास भेट देऊन पाहणी केली. पर्यटनानंतर पुण्यातील प्रसिद्ध दगडुसेठ गणपती मंदिरास भेट देत बाप्पाचे दर्शन घेतले. दर्शनानंतर विदेशी पाहुण्यांनी ‘ सेल्फी विथ बाप्पा ‘ असे म्हणत फोटो काढले. विणकाम, भरतकाम केलेल्या शाली घेतल्या. पर्यटनाचा आनंद घेत घेत विदेशी पाहुण्यांनी बाजारात फेरफटका मारला. लाकडी बांबूच्या वस्तू व विणकाम, भरतकाम केलेल्या मखमली शाली खरेदी केल्या. फेरफटका मारता मारता पाहुण्यांनी अनेक वस्तू निहाळत तेथील विक्रेत्यांशी संवाद साधला.
शनिवारवाड्यास छावणीचे स्वरूप
परिषदेचा समारोप झाल्यानंतर काही विदेशी पाहुण्यांचे पथक मंगळवारी संध्याकाळी येणार असल्याचे समजताच पोलिसांनी पुरातत्व विभागाच्या मदतीने ताबा मिळवत बंदोबस्त तैनात केला. बुधवारी सकाळी सहा ते साडे सात वाजेच्या दरम्यान १८ देशांचे प्रतिनिधी येणार असल्याने शनिवारवाड्यास छावणीचे स्वरूप आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा बंदोबस्त वाढवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.