

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शहरातील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्काच्या कारवाईचा धडका सुरू केला असून मार्केटयार्ड येथे कट रचून दरोडा टाकणार्या अविनाश गुप्ताच्या 12 जणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी विरोधी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे. त्यांनी पदभार घेतल्यापासून करण्यात आलेली ही 5 मोक्काची कारवाई आहे.
अविनाश रामप्रताप गुप्ता (20, वैदगौरव सोसायटी, शिंदे पुल, शिवणे), अदित्य अशोक मारणे (28, रा. कामगार विकास सोसायटी, दत्तनगर, वारजे माळवाडी), अजय बापु दिवटे (23, रा. रामनगर, वारजे पुणे), निलेश बाळु गोठे (20, रा. मंगळवारपेठ, पुणे), विशाल सतिश कसबे (20, रा. मंगळवार पेठ), दिपक ओमप्रकाश शर्मा (19, रा. राहुलनगर, शिवणे), गुरूजन सिंग सेवासिंग विरग (22, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर), संतोष बाळु पवार (23, रा. पानेशत रोड, खानापूर, हवेली), साई राजेंद्र कुंभार (19, रा. खानापूर, ता. हवेली, जि. पुणे), त्याचा एक अल्पवयीन साथीदार व फरार तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
12 नोव्हेंबर रोजी दोघे व्यावसायिक भागीदार त्यांच्या मार्केटयार्ड येथील कार्यालयात असताना आरोपींनी कट रचून ते फिर्यादीच्या कार्यालयात शिरले. तेथे फिर्यादीला पिस्तुलाचा धाक दाखवून 28 लाख व त्याच्या हातातील मोबाईल यावेळी आरोपींनी दरोडा टाकून चोरून नेला होता. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनघा देशपांडे, गुन्हे निरीक्षक सविता ढमढरे यांच्या पथकाने आरोपीच्या मोेक्काचा अहवाल परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यामार्फत अपर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्काच्या कारवाईला मंजुरी दिली.
गुप्ता टोळीवर ऐवध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याच्या उद्देशाने धमकी देवुन, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मारामारी, शस्त्र बाळगणे, दरोडा, जाळपोळ, दरोडा टाकणे तसेच सामन्य जनतेत दहशत निर्माण करणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.