पुणे: पालखी महामार्गामुळे अनेकांच्या स्वप्नातील घरे पूर्ण, शेतकर्‍यांना भूसंपादित जमिनीमुळे लाखोंचा मोबदला | पुढारी

पुणे: पालखी महामार्गामुळे अनेकांच्या स्वप्नातील घरे पूर्ण, शेतकर्‍यांना भूसंपादित जमिनीमुळे लाखोंचा मोबदला

संतोष ननवरे

शेळगाव : शहरी भाग असो वा ग्रामीण, प्रत्येक नागरिक व शेतकरी आपला व्यवसाय व प्रपंच मजबूत होण्यासाठी अहोरात्र धडपडत असतो. त्यात ग्रामीण भागातील शेतकरी अथवा नागरिक अनेक स्वप्ने घेऊन वाटचाल करीत असतो. प्रत्येकाचे आपला सुंदर असा बंगला किंवा घर असावे, असे स्वप्न असते. ते स्वप्न खर्‍या अर्थाने इंदापूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांचे पूर्ण झाले आहे, तर काही जणांचे होताना दिसत आहे. ते केवळ आणि केवळ श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी भूसंपादित झालेल्या जमिनीच्या मिळालेल्या मोबदल्यामुळे. इंदापूर तालुक्यातील अनेकांचे श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गामुळे स्वप्नातील घर व आलिशान बंगला मोठ्या थाटामाटात उभा राहत आहे.

श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या टप्पा क्र. 2 चे काम सध्या इंदापूर तालुक्यात जोरदार सुरू आहे. या पालखी मार्गासाठी दोन्ही बाजूला शेतजमिनींसह घरे, बंगले, व्यावसायिक दुकाने यांच्या जागा भूसंपादित करण्यात आल्या. त्याबद्दल शेतकरी, नागरिक आणि व्यावसायिकांना शासनदराप्रमाणे भरघोस कोट्यवधी व लाखो रुपयांचा मोबदला मिळाला. त्या पैशातून अनेकांनी मिळेल त्या ठिकाणी शेतजमिनी घेतल्या, काहींनी नवीन इमारती उभारून व्यवसाय पुन्हा नव्याने मोठ्या स्वरूपात उभे केले, तर काहींनी मिळालेले पैसे वेगवेगळ्या स्वरूपात सुरक्षित गुंतवणूक केले. काहींनी आलिशान गाडी खरेदी करून आलिशान बंगला बांधून स्वप्न सत्यात उतरविले. इंदापूर तालुक्यातील पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूला आलिशान बंगले, मोठमोठी व्यावसायिक दुकाने उभारलेली दिसून येत आहेत.

संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा टप्पा क्र. 2 हा इंदापूरपर्यंत 41 किलोमीटरचा आहे. पालखी मार्गासाठी 14 गावे भूसंपादनामध्ये समाविष्ट आहेत. टप्पा क्र. 2 मध्ये 175.27 हेक्टर एवढे क्षेत्र भूसंपादित होणार असून, त्यापैकी सध्या 172.71 हेक्टर एवढे क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. 2.56 हेक्टर एवढे क्षेत्र अजूनही भूसंपादित करावयाचे आहे. पालखी मार्गासाठी भूसंपादित करण्यात येणार्‍या जमिनीचा मोबदला म्हणून 448.84 कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार असून, त्यापैकी आतापर्यंत 413 कोटींचा मोबदला म्हणून संबंधित लाभार्थींना वाटप करण्यात आले आहे. उर्वरित क्षेत्र लवकर भूसंपादित करून शिल्लक मोबदला देखील वाटप करण्यात येणार आहे.

Back to top button