मुख्यमंत्र्यांनी परदेशातून महाराष्ट्रासाठी काही तरी आणावे, खासदार सुप्रिया सुळे यांची अपेक्षा | पुढारी

मुख्यमंत्र्यांनी परदेशातून महाराष्ट्रासाठी काही तरी आणावे, खासदार सुप्रिया सुळे यांची अपेक्षा

बारामती, पुढारी वृत्तसेवा: परदेश दौर्‍यावर असणार्‍या मुख्यमंत्र्यांनी तिकडून महाराष्ट्रासाठी काही तरी भरीव घेऊन यावे, नाही तर देशासाठी आणायचे आणि दुसर्‍यालाच कुणाला तरी देऊन टाकायचे असं व्हायला नको, या शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परदेश दौर्‍यावर निशाणा साधला.

बारामती तालुक्याच्या दौर्‍यावर सुळे सोमवारी (दि. 16) होत्या. या वेळी त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात हक्काची गुंतवणूकीची अनेक ठिकाणे आहेत, परंतु उद्योग मात्र परराज्यात जात आहेत. आपल्या पुणे जिल्ह्यातील काही उद्योग तिकडे गेले. आपलेही भले व्हावे आणि दुसर्‍याचेही भले व्हावे अशीच आमची भावना आहे. मात्र, आपल्याकडे आलेले हे रोजगार गुणवत्तेवर आलेले होते ते दुसरीकडे गेले याचे वाईट वाटते. यावर ’ईडी’ सरकार काही करत नाही. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परदेश दौर्‍यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येणार असल्याने ते वेळेत परत येणार आहेत. पंतप्रधानांचा दौरा नसता तर ते आणखी किती दिवस परदेशात राहिले असते, हे देवालाच ठाऊक असे म्हणत सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

आमदार बच्चू कडू यांच्या विधानाचा आधार घेत सुळे म्हणाल्या की, हे ’ईडी’ सरकार आल्यापासून या सरकारमधील आमदार कुठेही गेले तरी लहान मुलेही म्हणतात. अरे 50 खोकेवाला आमदार आला, ही आता सर्वसामान्यांची भावना झाली आहे. ’ईडी’ सरकारमधील काहींनी खोके घेतल्याने केवळ तुमचे, आमचे नव्हे तर राज्याचे नुकसान होत आहे. , ’हे पन्नास खोके घेतले की विकले जातात’ हे सर्वत्र बोलले जाते. सरकारला इतर सगळे काही करायला वेळ आहे, परंतु बेरोजगारी, महागाई कमी करण्यासाठी, हमीभाव देण्यासाठी वेळ नसल्याचे सुळे यांनी सांगितले.

Back to top button