गोर्‍हे बुद्रुकला कोयता गँगची दहशत; महिला, मुलांना जबर मारहाण | पुढारी

गोर्‍हे बुद्रुकला कोयता गँगची दहशत; महिला, मुलांना जबर मारहाण

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : पुणे-पानशेत रस्त्यावरील गोर्‍हे बुद्रुक (ता. हवेली) येथील माळवाडी भागात किरकोळ कारणावरून महिला- मुलांना बेदम मारहाण करण्यात आली. तलवार व कोयते घेऊन दहशत निर्माण करणार्‍या कोयता गँगच्या अकरापैकी पाच हल्लेखोरांना हवेली पोलिसांनी अटक केली असून, सहा फरार हल्लेखोरांचा शोध पोलिस घेत आहेत.

हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले, पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निरंजन रणवरे, नितीन नम, अजय पाटसकर, नीलेश राणे, राजेंद्र मुंडे, रजनीकांत खंडाळे आदींच्या पथकाने कोयता गँगला जेरबंद केले. सुरज जालिंदर ठाकूर (वय 21), नीलेश श्रीराम साह (वय 23), अक्षय सुरेश चव्हाण (23), सागर कांतू पाटील (वय 22), निकून ऊर्फ अनिकेत विनायक मोरे (वय 22, सर्व रा. गोर्‍हे बुद्रुक, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

फरार हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी छापे घातले. मारहाणीची घटना रविवारी (दि. 15) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास गोर्‍हे बुद्रुक येथील माळवाडी भागात घडली. गल्लीतील अरुंद रस्त्यावर लहान मुले खेळत होती. त्या वेळी एका मुलाने आरोपींना गाडी हळू चालवा, असे सांगितले. त्यावरून हल्लेखोरांचा रहिवाशांंशी वाद झाला.

त्यामुळे चिडलेल्या आरोपीने आपल्या दहा साथीदारांसह हातात तलवार व कोयते घेऊन माळवाडी भागात दहशत निर्माण केली. महिला, मुलांना जबर मारहाण केली तसेच ठार मारण्याची धमकी देत आरोपी फरार झाले. त्यानंतर रहिवाशांनी हवेली पोलिस ठाण्यात धाव घेतली. जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी घटनेचे गांभीर्य पाहून कठोर कारवाईच्या सूचना दिल्या.

Back to top button