बारामती : कोयता अन् फोयता गँग चालणार नाही : विरोधी पक्षनेते अजित पवार | पुढारी

बारामती : कोयता अन् फोयता गँग चालणार नाही : विरोधी पक्षनेते अजित पवार

बारामती; पुढारी वृत्तसेवा : ’बारामतीत प्रत्येकाला सुरक्षित वाटले पाहिजे. जर कुणी चुकत असेल, महिलांकडे कुणी वाकड्या नजरेने बघत असेल तर ते मी खपवून घेणार नाही. इथे कोयता गँग नाही अन् फोयता गँग चालणार नाही. माझा कार्यकर्ता चुकलातरी अ‍ॅक्शन घ्या, अशा सक्त सूचना मी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना दिल्या आहेत,’ अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
बारामतीतील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेसंबंधी पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

पवार म्हणाले, ’शनिवारी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची बैठक घेत सविस्तर मार्गदर्शन केले आहे. त्यांनी कान टोचले आहेत. बारामतीत एका व्यापार्‍याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडल्याचे मला समजले. या संबंधी मी अप्पर पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांशी बोललो आहे.

मी लोकप्रतिनिधी या नात्याने कधीही पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप करत नाही. जर काम करताना माझ्या पक्षाचा कार्यकर्ता चुकला तरी त्यावर अ‍ॅक्शन घ्यायला मागेपुढे बघत नाही. पोलिसांना पूर्ण मुभा देत असतो. शनिवारी बारामतीत घडलेल्या घटनेची पोलिसांनी वस्तुस्थिती तपासावी. ज्यांची चूक असेल त्यांच्यावर सक्त कारवाई करावी. पुन्हा या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.’

‘बारामतीत पोलिसांसाठी चांगली कार्यालये, घरे दिली आहेत. त्यांना चांगली वाहने उपलब्ध करून दिली आहेत. अनेक भौतिक सुविधा पोलिसांना दिल्या आहेत, त्यामुळे येथे चांगली कायदा व सुव्यवस्था ठेवणे, लोकांना सुरक्षित वाटेल अशी स्थिती निर्माण करणे हे पोलिसांचे काम आहे. जर कुठे काही चुकीचे घडत असेल तर माझ्या निदर्शनास आणून द्या,’ असेही पवार म्हणाले.

Back to top button