जेजुरी देवसंस्थान विश्वस्तपदी जेजुरीकरच हवा; ग्रामसभेत निर्णय | पुढारी

जेजुरी देवसंस्थान विश्वस्तपदी जेजुरीकरच हवा; ग्रामसभेत निर्णय

जेजुरी; पुढारी वृत्तसेवा : जेजुरीतील श्रीमार्तंड देवसंस्थानवर विश्वस्त नेमणुकीची प्रक्रिया सुरू आहे. पदावर जेजुरीतील सुशिक्षित, देवाचे मानकरी,नित्यसेवेकरी,पालखी सोहळ्याचे खांदेकरी,ग्रामस्थ मंडळाचे सदस्य,देवाच्या धार्मिक परंपराची जाण असणार्‍या जेजुरीकरांचीच नियुक्ती करावी, असा ठराव जेजुरी ग्रामसभेत घेण्यात आला.

जेजुरीकरांच्या मागणीबाबतचे निवेदन पुणे येथील सह धर्मादाय आयुक्त कार्यालयात देणार असल्याचे पालखी सोहळ्याचे इनामदार राजेंद्र पेशवे यांनी सांगितले. महाराष्ट्राचे कुलदैवत श्रीखंडोबा मंदिराचे व्यवस्थापन पहाणार्‍या श्रीमार्तंड देवसंस्थान न्यासावर काम करणार्‍या विश्वस्त मंडळाचा कार्यकाल संपला आहे. नवीन विश्वस्त नेमण्यासाठी पुणे सह धर्मादाय आयुक्त कार्यालयाने इच्छुकांचे अर्ज घेतले असून, पुढील प्रक्रिया सुरू आहे.

विश्वस्त मंडळावर जेजुरीचे नागरिक असावेत यासाठी चर्चा करण्यासाठी शनिवारी (दि.14) जेजुरी येथील ऐतिहासिक छत्री मंदिर आवारात ग्रामस्थांची बैठक झाली. बैठकीसाठी राजेंद्र पेशवे, श्रीखंडोबा पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, मानकरी अरुण खोमणे, सुधीर गोडसे,राजा चौधरी,छ्बन कुदळे,डॉ.प्रसाद खंडागळे, अ‍ॅड. मंगेश जेजुरीकर,रोहिदास माळवदकर, नगरसेवक जयदीप बारभाई, शिवसेनेचे विठ्ठल सोनवणे व मोठ्या संख्येने जेजुरीकर ग्रामस्थ उपस्थित होते.

बैठकीत बाहेरगावातील विश्वस्त पूर्ण वेळ देऊ शकत नाही. येथील सण-उत्सवाची, परंपरांची माहिती त्यांना नसते, अनेकदा काही प्रश्न निर्माण झाल्यास स्थानिक विश्वस्तांवर जबाबदारी देऊन बाहेरील विश्वस्त अंग काढून घेतात. मंदिराच्या कारभारात कोणत्याही पक्षाचे राजकारण आणू नये, तसेच राजकीय कामासाठी भाविकांच्या निधीचा वापर होत असल्याने असाप्रकार यापुढे होऊ नये असा ठराव घेण्यात आला. मागणीचे निवेदन पुणे सह धर्मादाय आयुक्त यांना देणार असल्याचा निर्णयही घेण्यात आला.

श्रीमार्तंड देवसंस्थानची सर्व समावेशक घटना तयार करणे आवश्यक आहे. स्थानिकांना पिढ्यानि्पढ्या यात्रा जत्रा,उत्सवाबाबत जाण असून, धर्मादाय आयुक्त कार्यालयाने स्थानिकांना प्राधान्य द्यायला हवे.

                                                     – डॉ. प्रसाद खंडागळे, माजी विश्वस्त, जेजुरी.

Back to top button