शिरवली बंधार्‍याच्या गळतीमुळे शेतीला धोका; जलसंपदा विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर

शिरवली बंधार्‍याच्या गळतीमुळे शेतीला धोका; जलसंपदा विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर
Published on
Updated on

अनिल तावरे

सांगवी : शेतकर्‍यांना शेती पिकविण्यासाठी पाण्याची नितांत गरज असते. शेतातील पिकांना वेळेवर पाणी उपलब्ध झाल्यास एकरी उत्पन्नात वाढ होते. परंतु, उपलब्ध असणार्‍या पाण्याचे योग्य नियोजन झाले नाही, तर मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. निरा नदीकाठच्या शेतीला पाणी पुरवठा होण्यासाठी शिरवली (ता. बारामती) येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. या बंधार्‍याच्या दरवाजांतून मोठ्या प्रमाणावर गळती सुरू आहे. या गळतीमुळे अवघ्या एक महिन्याच्या आतच बंधारा कोरडा पडण्याची शक्यता आहे. परिणामी, नदीकाठच्या शेतीला धोका निर्माण झाला आहे.

बंधार्‍याच्या गळतीचा गंभीर प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना व राजकीय नेत्यांना शेतकर्‍यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला असल्याचे चित्र आहे. दरवर्षी होणार्‍या गळतीमुळे जलसंपदा विभागाचा ढिसाळ कारभार यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. या बंधार्‍याला 43 मोर्‍या आहेत. त्यातील 24 मोर्‍यांच्या दरवाजातून सध्या मोठ्या प्रमाणावर गळती सुरू आहे.

वास्तविक गळती नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बंद होणे गरजेचे असते. परंतु, जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना या गंभीर गोष्टींकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याने बंधार्‍यातील पाण्याची गळती थांबली जात नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात गळती सुरू असताना एकही राजकीय पदाधिकारी बंधार्‍याकडे फिरकलेला नाही.

शिरवली बंधार्‍याच्या पाण्यावर शिरवलीसह, सांगवी व कांबळेश्वर तसेच फलटण तालुक्यातील सांगवी, सोमंथळी येथील हजारो एकर शेती अवलंबून आहे. या बंधार्‍याची गळती रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर हा बंधारा एक महिन्याच्या आतच रिकामा होऊन निरा नदीकाठची शेती धोक्यात येऊ शकते.

अजित पवार यांना पत्र
शिरवली बंधार्‍याची गळती रोखण्यासाठी विधानसभेतील
विरोधी पक्षनेते अजित पवार यांना भेटून ग्रामपंचायतीच्या वतीने लेखीपत्र दिले असल्याचे उपसरपंच प्रणिती पोंदकुले यांनी सांगितले.

गळती रोखण्यासाठी प्रयत्न करू
शिरवली बंधार्‍याच्या गळतीबाबत पणदरे जलसंपदा विभागाचे उपअभियंता प्रवीण घोरपडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बंधार्‍याची गळती रोखण्यासाठी संबंधित ठेकेदाराला सूचना देण्यात आली आहे. गळती थांबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे घोरपडे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news