पुणे; पुढारी वृत्तसेवा : जागतिक नाणेनिधीच्या अहवालानुसार जगभरात आर्थिक मंदी येऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतात जूननंतर आर्थिक मंदी येण्याची शक्यता आहे. मात्र, नागरिकांना आणि पर्यायाने देशाला मंदीची झळ पोहोचू नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली नियोजन केले जात आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली. पुण्यात सोमवारी जी 20 परिषदेचे उदघाटन नारायण राणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. उद्योगांमधील गुंतवणूक, पायाभूत सुविधा, रोजगार अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले.