कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण मार्गी लागणार? | पुढारी

कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण मार्गी लागणार?

कात्रज; पुढारी वृत्तसेवा : कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण गेल्या काही वर्षांपासून जागा हस्तांतरणाअभावी रखडले आहे. जागा अधिग्रहणासाठी 268 कोटींचा निधी देण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वत: मान्यता दिल्याचे माजी आमदार योगेश टिळेकर यांनी सांगितले, तर कात्रज चौकातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत ‘डीपीआर’ची मागणी केल्याचे आमदार चेतन तुपे-पाटील यांनी सांगितले. या कामावरून आजी-माजी आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे दिसून येत असून, दोघांनी परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत.

कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्प हा वाहतूक कोंडी, अपघात, निष्पापांचे बळी, आंदोलने, पीपीपी, निविदा प्रक्रिया, भ—ष्ट्राचार यासह विविध अडथळ्यांची शर्यत पार करत सुरू झाला. मात्र, तो जागा अधिग्रहणाच्या विळख्यात अडकला. महापालिका प्रशासनाच्या अनास्थेसमोर सर्वसामान्य नागरिकांनी गुडघे टेकले. या प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून निधी देण्यात येणार असल्याचे सांगितले गेल्याने परिसरातील नागरिकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

आमदार टिळेकर यांनी या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. ते म्हणाले, ‘विकास आराखड्यातील 84 मीटर कात्रज-कोंढवा रस्तारुंदीकरणासाठी महापालिकेने 200 कोटींचे टेंडर काढले. त्यानुसार 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करून काम सुरू झाले. वर्षभरात कामाला गतीदेखील आली. मात्र, रुंदीकरणातील बाधित जागा मालकांनी टीडीआर, एफएसआयऐवजी रोख मोबदला देण्याची मागणी करत जागा देण्यास विरोध केला. विद्यमान आमदार व स्थानिक नेत्यांनी जागामालकांची दिशाभूल केली. त्यांना रोख मोबदला मागण्यास सांगितले, त्यामुळे गेली 3 वर्षांपासून हे काम रखडले आहे.’

हडपसरच्या आमदारांनी हिवाळी अधिवेशनात कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे भूमिपूजन होऊन काम सुरू झाले नसल्याचे सांगितले. मात्र, ते गेल्या वर्षाभरात कात्रज भागात फिरकले नसल्याने त्यांना उड्डाणपुलाचे कॉलम दिसले नसल्याचा टोला टिळेकर यांनी लगावला.
आमदार तुपे म्हणाले, ’माजी आमदार, घरात नगरसेवक, महापालिकेत सत्ता असताना पाच वर्षांत कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम का पूर्ण केले नाही, याचे उत्तर त्यांनी आधी द्यावे. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी करमणूक करणारे आरोप माजी आमदारांना सध्या करावे
लागत आहेत.’

कात्रज ते नवले पूल सहापदरी महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे कॉलम उभे झाले असून, फेब्रुवारी 2024 मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल. रुंदीकरणाचा रखडलेला प्रश्नही लकवरच मार्गी लागेल.

                                                            -योगेश टिळेकर,
                                                             माजी आमदार

कात्रज चौकातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी हिवाळी अधिवेशनात डीपीआरची मागणी केली आहे. मागील काळात भूमिपूजन होऊनही चौकातील उड्डाणपूल अद्याप सुरू झाला नाही.
                                                           -चेतन तुपे, आमदार

Back to top button