ऑनलाइन वीजबिलभरणा वाढता वाढे! महावितरणला तीन महिन्यांत 1 हजार 375 कोटी रुपयांचा महसूल | पुढारी

ऑनलाइन वीजबिलभरणा वाढता वाढे! महावितरणला तीन महिन्यांत 1 हजार 375 कोटी रुपयांचा महसूल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे परिमंडलाने वीजबिलांचा ’ऑनलाइन’ भरणा करण्यामध्ये राज्यातील आघाडी कायम ठेवली आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये सुमारे 55 लाख 94 हजार 467 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक व इतर लघुदाब वीजग्राहकांनी रांगेत उभे न राहता व सुरक्षितपणे 1 हजार 375 कोटी 18 लाख रुपयांचा ’ऑनलाइन’ भरणा केला आहे. या आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबरपर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड शहर तसेच आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यातील 1 कोटी 60 लाख 45 हजार 632 लघुदाब वीजग्राहकांनी तब्बल 4 हजार 112 कोटी 71 लाख रुपयांच्या वीजबिलांचा ’ऑनलाइन’ भरणा केला आहे.

उच्चदाब वीजग्राहकांसाठी दरमहा वीजबील आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे भरण्याची सोय उपलब्ध असून, ती बंधनकारक करण्यात आली आहे, तर लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचे वीजबील 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास ते आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे भरण्याची सोय आहे. त्यासाठी 10 हजारांपेक्षा अधिक रकमेच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देण्यात येत आहे, तर त्यापेक्षा कमी रकमेच्या बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणची अधिकृत वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपची सोय उपलब्ध आहे.

त्याद्वारे बिलाचा भरणा करणे, चालू व मागील वीजबिल पाहणे, पावती पाहणे, एकाच खात्यातून अनेक वीजजोडण्यांचे बिल भरणे यासह इतर सर्व ग्राहक सेवा उपलब्ध आहेत. गेल्या एप्रिल ते सप्टेंबर 2022 पर्यंत पुणे परिमंडलातील लघुदाब वर्गवारीतील सरासरी 17 लाख 41 हजार 860 वीजग्राहक दरमहा ’ऑनलाइन’ वीजबिल भरणा करीत होते; मात्र ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत ग्राहकांची दरमहा सरासरी संख्या थेट 18 लाख 64 हजार 822 वर गेली आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये ’ऑनलाइन’द्वारे वीजबिल भरणार्‍या पुणे परिमंडलातील ग्राहकांची संख्या 20 लाखांवर जाईल असे चित्र आहे.

गेल्या तिमाहीमध्ये पुणे शहरातील 31 लाख 56 हजार 69 लघुदाब वीजग्राहकांनी 740 कोटी 40 लाख रुपयांच्या वीजबिलांचा ’ऑनलाइन’ भरणा केला आहे. यामध्ये महावितरणच्या बंडगार्डन विभागातील सर्वाधिक 5 लाख 28 हजार 248 ग्राहकांचा समावेश आहे. उर्वरित शिवाजीनगर, कोथरूड, नगररोड, पद्मावती, पर्वती व रास्ता पेठ विभागांमध्ये दरमहा सरासरी 4 लाख 38 हजार वीजग्राहकांनी ’ऑनलाइन’ वीजबिल भरण्यास पसंती दिली आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या तिमाहीत लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांपैकी 14 लाख 77 हजार 830 ग्राहकांनी 375 कोटी 65 लाखांच्या वीजबिलांचा ’ऑनलाइन’ भरणा केला आहे. पुणे परिमंडलामध्ये ’ऑनलाइन’ वीजबिल भरण्यात पिंपरी-चिंचवड शहर आघाडीवर आहे.

Back to top button