पुणे : ‘युद्धात, शांततेत एकत्र आलो नाही, तर आपली मोठी हानी’ : व्हाईस अ‍ॅडमिरल मुरलीधर पवार (निवृत्त) | पुढारी

पुणे : ‘युद्धात, शांततेत एकत्र आलो नाही, तर आपली मोठी हानी’ : व्हाईस अ‍ॅडमिरल मुरलीधर पवार (निवृत्त)

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जगातील सर्वांत मोठे युद्ध पानिपतमध्ये झाले. खरे तर एका दृष्टीने पाहिल्यास मराठे हरले नाहीत. मात्र, युद्धात व शांततेत आपण एकत्र आलो नाही, तर खूप मोठी हानी होते. हे आपण पानिपत, ब्रिटिश यांच्यासोबत लढताना पाहिले आहे. अनेक मराठा वीर आजही देशाच्या सीमेवर देशरक्षणासाठी पहारा देत आहेत. त्यामुळे इतिहासातील व आज देशरक्षणार्थ लढणार्‍या प्रत्येकाचे स्मरण आपण ठेवायला हवे, असे मत भारतीय नौदलाचे व्हाईस अ‍ॅडमिरल मुरलीधर पवार (निवृत्त) यांनी व्यक्त केले.

श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्रतर्फे मराठा शौर्य दिनानिमित्त पानिपतवीरांना शौर्यवंदना देण्याकरिता लालमहाल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुरलीधर पवार, कात्रज दूध संघाच्या चेअरमन केशरताई पवार, शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांची अष्टधान्यतुला करण्यात आली.

कार्यक्रमाला ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, मेजर जनरल (निवृत्त) डॉ. विजय पवार, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर पवार यांसह महाराष्ट्रातील पदाधिकारी व पवार घराण्यातील बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमात विक्रांत पवार, आशिष पवार, अ‍ॅड. रोहिणी पवार यांना धार पवार भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. शस्त्रपूजन, ध्वजपूजन, दीपोत्सव आदी विविध कार्यक्रमांद्वारे पानिपतवीरांना अभिवादन करण्यात आले.

डॉ. विजय पवार म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये नेतृत्व आणि उत्तम रणनीती आखण्यासारखे महत्त्वाचे गुण होते. नेतृत्व करणारी व्यक्ती तेजस्वी, चपळ, जागरुक, निर्णयक्षमता, विश्वासाहर्ता, चिकाटी, उत्साही असायला हवी. प्रत्येक गुणाचे महत्त्व वेगळे असते. शिवरायांसारखे हे गुण आपल्या आजच्या पिढीमध्ये असायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button