मुंबई विद्यापीठाचा आविष्कार स्पर्धेत डंका; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला उपविजेतेपद | पुढारी

मुंबई विद्यापीठाचा आविष्कार स्पर्धेत डंका; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला उपविजेतेपद

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित 15 व्या आंतरविद्यापीठीय संशोधन संमेलनाचा (आविष्कार स्पर्धा) समारोप रविवारी (दि.15) झाला. यंदा या संमेलनाचे विजेतेपद मुंबई विद्यापीठाला मिळाले आहे. तर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संघ हा उपविजेता ठरला आहे. या आविष्कार स्पर्धेतील उल्लेखनीय संशोधन प्रकल्प सादर करणार्‍यांना प्रजासत्ताक दिनी राजभवन येथे आमंत्रित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील विद्यापीठांसाठी दर वर्षी राजभवन कार्यालयाकडून आविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाचे या स्पर्धेचे पंधरावे वर्ष होते. मागील चार दिवसांपासून ही स्पर्धा विद्यापीठात सुरू होती. या स्पर्धेचा समारोप रविवारी झाला.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीचे संचालक प्रा. डॉ. आर. कृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर, अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन समिती सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, निरीक्षण समितीचे अध्यक्ष सुनील पाटील, आविष्कार समितीचे अध्यक्ष राजेश पांडे, निमंत्रक डॉ. संजय ढोले, अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, डॉ. पराग काळकर, डॉ. विजय खरे, डॉ. दीपक माने आदी उपस्थित होते.

आंतरविद्याशाखीय संशोधन गरजेचे : कृष्णन
डॉ. कृष्णन म्हणाले, की एकूणच तापमानात वाढ होत असताना हवामान बदल हा खूप महत्त्वाचा विषय झाला असून, हा संपूर्ण जैविक परिसंस्थेवर परिणाम करणारा आहे. अचानक येणारा पूर, प्रदूषित हवा या सगळ्यांवर अधिकाधिक संशोधन होणे आवश्यक आहे.
डॉ. कारभारी काळे यांनी समाज आणि संवेदनांची जाणीव ठेवत संशोधनाचे प्रश्न निवडावेत, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. या वेळी डॉ.रवींद्र शिंगणापूरकर, डॉ. सुनील पाटील, डॉ. संजय ढोले, विद्यार्थी आणि प्राध्यापकांनीदेखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय चाकणे यांनी केले.

विजेतेपद
मुंबई विद्यापीठ

उपविजेतेपद
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

विषयानुसार विजेतेपद
मुंबई विद्यापीठ, मानवविद्या आणि भाषा, कृषी आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वाणिज्य, व्यवस्थापन व विधी विज्ञान

 

 

Back to top button