पुणे : अबब! महिनाभरामध्ये अकरा कोटींची वीजचोरी; 879 प्रकरणे उघड | पुढारी

पुणे : अबब! महिनाभरामध्ये अकरा कोटींची वीजचोरी; 879 प्रकरणे उघड

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महावितरणच्या 63 भरारी पथकांनी मागील महिन्यात केलेल्या धडक कारवाईत राज्यातील 879 प्रकरणे उघडकीस आली असून, त्यातून 11 कोटी 69 लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचे उघडकीस आले. महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभाग कार्यकारी संचालक प्रमोद शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी केली.

महावितरणच्या भरारी पथकांनी वीजचोरी पकडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. वीजचोरीशिवाय इतर अनियमितता असलेल्या एकूण 539 प्रकरणांमध्ये 13 कोटी 67 लाख 60 हजार रुपयांची वीजदेयकेही देण्यात आली. वीजचोरीतील बहुतांश प्रकरणे ही वाणिज्य आणि औद्योगिक ग्राहकांची आहेत.

पुण्याजवळ वाघोली येथे भरारी पथकाने धाड टाकली असता, दोन स्टोन क्रशरची वीजचोरी उघडकीस आली. त्यांना 1 कोटी 44 लाख रुपयांचे वीजचोरीचे बिल देण्यात आले. दोन्ही औद्योगिक ग्राहकांवर विद्युत कायदा 2003 अन्वये वीजचोरीची फिर्याद दाखल करण्यात आली. उल्हासनगरमध्ये एका औद्योगिक ग्राहकावर धाड टाकल्यावर वीजचोरी उघडकीस आली. त्या ग्राहकास 31 लाख 65 हजार रुपयांचे वीजचोरीचे बिल देण्यात आले.

डिसेंबरमध्ये झालेली परिक्षेत्रनिहाय वीजचोरींची प्रकरणे

परिक्षेत्र          वीजचोरीची रक्कम              एकूण प्रकरणे
कोकण         4 कोटी 40 लाख रुपये               249
पुणे              3 कोटी 68 लाख रुपये               135
नागपूर         1 कोटी 72 लाख रुपये               244
औरंगाबाद    1 कोटी 88 लाख रुपये                251
एकूण          11 कोटी 69 लाख रुपये              879

मागील नऊ महिन्यांतील वीजचोरीची प्रकरणे : 6 हजार 801

वीजचोरीची किंमत – 86 कोटी 10 लाख रुपये

अनियमितता असलेली प्रकरणे : 6336 (167 कोटी 11 लाख रुपयांची देयके)

Back to top button