पुणे : तंत्रशिक्षण महाविद्यालयांना एनबीए मूल्यांकनाचे वावडे! | पुढारी

पुणे : तंत्रशिक्षण महाविद्यालयांना एनबीए मूल्यांकनाचे वावडे!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : तंत्रशिक्षण संचालनालयाशी संलग्न असलेल्या सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संस्थांना एनबीए मूल्यांकन व एनबीए पुनर्मूल्यांकन करण्याच्या सूचना तंत्रसंचालनालयातर्फे वेळोवेळी देण्यात येतात. मात्र, अनेक संस्था मूल्यांकन करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत संबंधित संस्थांनी मूल्यांकन न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिला आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संस्थांना एनबीए मूल्यांकन प्राप्त करून घेण्याच्या सूचना तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने वेळोवेळी दिलेल्या आहेत. तसेच एन. बी. ए. मूल्यांकनाशिवाय संबंधित संस्थेत नवीन अभ्यासक्रम, सध्या सुरू असलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ करता येत नाही. परिणामी, संस्थेची विकासात्मक वाढ होत नाही. त्यामुळे ज्या संस्थांचा एनबीए मानांकनाचा कालावधी संपला आहे, त्यांनी एनबीए पुर्नमूल्यांकन करून घेणे गरजेचे आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनाकरिता शैक्षणिक वर्ष 2022-23 व त्यानंतर मूल्यांकन व दर्जाचे मानांकन प्राप्त करून घेण्यासाठी पात्र ठरलेल्या संस्थांना त्यापुढील शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंत संबंधित शिखर संस्थांकडे मानांकन प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे.

नवीन शिक्षण धोरणामध्ये तसेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या धोरणामध्ये दर्जात्मक शिक्षण आणि दर्जेदार शैक्षणिक संस्थांना देण्यात आलेले प्राधान्य विचारात घेता संस्थानी मूल्यांकन व दर्जा मानांकन प्राप्त करून घेणे अत्यावश्यक आणि अपरिहार्य आहे. त्यासाठी मूल्यांकनास पात्र संस्थांनी पुढील सहा महिन्यांत एनबीए मूल्यांकन आणि पुर्नमूल्यांकन प्राप्त करून घेण्यात यावे अन्यथा संबंधित संस्थांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा डॉ.वाघ यांनी दिला आहे.

Back to top button