पारगाव : कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणीच; बराकीत साठविलेल्या कांद्यांचा झाला कोळसा | पुढारी

पारगाव : कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणीच; बराकीत साठविलेल्या कांद्यांचा झाला कोळसा

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : कांद्याला उच्चांकी बाजारभाव मिळेल, या आशेने बराकीत साठवलेला कांदा सडून गेला, त्याचा अक्षरश: कोळसा झाला. मात्र, चांगला बाजारभाव काही मिळालाच नाही. कांदा पिकासाठी गुंतवलेले भांडवल ही यामुळे वसूल झाले नाही. बँक, सोसायटीचे कर्ज आणि प्रापंचिक गरजा कशा भागवायच्या, याचा मोठा प्रश्न कांदा उत्पादकांच्या समोर उभा आहे. त्यांच्या डोळ्यांतील पाणी कायम आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात दर वर्षी रब्बी हंगामात कांदा पीक मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेतात.

बाजारभाव जादा मिळण्याच्या आशेने शेतकरी कांदा काढणी करून कांदा बराकींमध्ये साठवितात. गेली तीन-चार वर्षांमध्ये शेतकर्‍यांना कांदापिकामुळे आर्थिक तोटाच सहन करावा लागला आहे. साठवलेला कांदा दूषित हवामानामुळे लवकरच सडून जातो. शेतकर्‍यांना त्यामुळे कमी बाजारभावातही कांदा बाजारपेठेत पाठवून विकावा लागतो. गतवर्षीच्या हंगामातील काढणी केलेले कांदे चांगला बाजारभाव मिळेल . या आशेने शेतकर्‍यांनी बराकींमध्ये साठवले, परंतु ते एक महिन्याच्या आतच सडू लागले.

अनेक शेतकर्‍यांनी त्यामुळे मिळेल त्या बाजारभावात कांदे विकून टाकले. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात कांद्यांना दहा किलोंना साडेतीनशे रुपये बाजारभाव मिळाला होता. हाच बाजारभाव उच्चांकी ठरला. त्यानंतर बाजारभावात पुन्हा घसरण झाली. कांदा सडण्याचे प्रमाणदेखील जादाच राहिले.

सध्या तालुक्याच्या पूर्व भागात रांजणी, वळती, नागापूर, शिंगवे, पारगाव आदी गावांमध्ये अनेक शेतकर्‍यांच्या कांदा बराकींमध्ये गतवर्षीच्या हंगामातील कांदे मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहेत. परंतु, त्या कांद्यांचा अक्षरश: सडून काळा कोळसा झाल्याचे चित्र दिसत आहे.

Back to top button