काँग्रेसने चर्चा केली असती, तर ही वेळ आली नसती; नाशिक पदवीधर उमेदवारीवरून शरद पवारांकडून चिमटा | पुढारी

काँग्रेसने चर्चा केली असती, तर ही वेळ आली नसती; नाशिक पदवीधर उमेदवारीवरून शरद पवारांकडून चिमटा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीबाबत काँग्रेसने महाविकास आघाडीतील सहयोगी पक्षांसोबत चर्चा केली असती तर सध्याचा राजकीय पेच निर्माण झालाच नसता, असे राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना याबाबत मी सतर्क केले होते. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच हा प्रसंग ओढवला, असे ते म्हणाले. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे दिसतेय ते काळजी करण्यासारखे आहे.

राज्यातील विधान परिषदेचे पाचही मतदारसंघ महाविकास आघाडीत कोणता पक्ष लढवणार याबाबत स्पष्ट चर्चा झाली होती. त्यानंतर ज्या पक्षाच्या वाट्याला मतदारसंघ आला आहे, त्यांनी कोणाला उमेदवारी द्यायची, हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे. नाशिकचा प्रश्न त्या पक्षाने अधिक योग्य रीतीने हाताळणे गरजेचे होते. डॉ. तांबे यांच्या ऐवजी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती, तर हा वाद उद्भवला नसता. हे सगळे घडण्यापूर्वी चर्चा केली असती, तर असे काही अगतिक घडले नसते, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेत्यासह पक्षाचेही मोठे नेते आहेत. त्यांच्या स्वभावानुसार त्यांचा समंजसपणा जास्त दिसून येतो. त्यामुळे ते कधीही टोकाची भूमिका घेत नाहीत. मात्र, त्यांनी नाशिक प्रकरणात वेळीच हस्तक्षेप केला असता, तर हा प्रसंग टाळता आला असता, असे पवार म्हणाले.

स्पर्धा परीक्षा आंदोलनकर्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांना फोन
मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची (स्पर्धा) तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. या विषयावर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने रविवारी शरद पवार यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या. त्या वेळी विद्यार्थ्यांची भूमिका ऐकून घेतल्यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नात लवकरात लवकर तोडगा काढा, वेळप्रसंगी या विषयावर एकत्र बैठक घेऊ, असेही सुचवले.

Back to top button