पुण्यात आजपासून जी-20 परिषद; नारायण राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन | पुढारी

पुण्यात आजपासून जी-20 परिषद; नारायण राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यात होत असलेल्या जी – 20 परिषदेचे उद्घाटन सोमवारी (दि. 16) सकाळी 9 वाजता केंद्रीय अवजड उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. उद्घाटनाच्या पहिल्या सत्रात वाढत्या शहरीकरणावर परिसंवाद होणार असल्याची माहिती अर्थ विभागाचे केंद्रीय सहसचिव सालोमन आरोकिरज यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांना दिली.

जी- 20 परिषदेच्या निमित्ताने आरोकिरज यांनी पत्रकारांशी संवाद साधत दोनदिवसीय परिषदेत काय काय होणार याची माहिती दिली. ते म्हणाले, या परिषदेत जगभरातील पायाभूत सुविधा, वाढते शहरीकरण आणि त्या समोरची आव्हाने यावर परिषदेत पहिल्या दिवशी चर्चा होईल. उद्घाटनाचे सत्र सोमवारी (दि.16) सकाळी 9 वाजता होईल.

त्यानंतर हॉटेल जे.डब्ल्यू मेरियट येथे दुपारी 1 ते 3 शहरीकरण या विषयावर सात विविध परिसंवाद होतील. त्यानंतर दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सावित्रीबाई फुले विद्यापीठात जगभरातून आलेल्या पाहुण्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात भारतीय लोककला, लोकसंगीत व लावणी असे कार्यक्रम करून मराठी संस्कृतीची ओळख करून दिली जाणार आहे.

मंगळवारी पर्यावरण र्‍हासावर चर्चा
मंगळवारी (दि. 17) या परिषदेची सर्व सत्रे हॉटेल जे. डब्ल्यू मेरियट येथे होणार आहेत. यात प्रामुख्याने वाढते शहरीकरण, पर्यावरणाचा र्‍हास, कोविडसारखी संकटे आली तर काय करावे, तसेच शहरांचा आर्थिक विकास, शहरी व ग्रामीण भागातील दरी, नागरिकांचे दरडोई उत्पन्न यावर चर्चा होणार आहे.

20 देशांतील 66 प्रतिनिधी पुण्यात
सॉलोमन यांनी सांगितले की, 20 देशांतून पुण्यातील हॉटेल जे. डब्ल्यू मेरिटमध्ये 66 प्रतिनिधी आले आहेत. यात जागतिक बँक, आयएफसी, ओएसइडी, एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या प्रतिनिधींचा समावेशआहे.

Back to top button