‘जी 20’मुळे शहर बनले लग्नघर! आज, उद्या 20 देशांतून आलेल्या 66 पाहुण्यांचा मुक्काम | पुढारी

‘जी 20’मुळे शहर बनले लग्नघर! आज, उद्या 20 देशांतून आलेल्या 66 पाहुण्यांचा मुक्काम

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विमानतळ ते सेनापती बापट रोडवरील हॉटेल जे डब्ल्यू मेरियट व त्यापुढे विद्यापीठ परिसरापर्यंतचे रस्ते स्वागतासाठी लग्न घरासारखे सजवले आहेत. चौकाचौकांत आकर्षंक फुलझाडांच्या कुंड्या, विद्युत खांबांवर तिरंगी लायटिंग, गुळगुळीत रस्ते, रस्त्यालगत सायकल ट्रॅकचे पट्टे, दुतर्फा पुण्याची संस्कृती दर्शन घडवणारी भिंत्तीचित्रे अशी लगीनघाई रविवारी शहरात दिसत होती. सोमवार व मंगळवार असे दोन दिवस 20 राष्ट्रांतून आलेले तब्बल 66 प्रतिनिधी शहरात मुक्कामी राहणार असून, महापालिका शहराच्या विस्तारीकरणावरील या परिषदेत सादरीकरण करणार आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात जी-20 परिषदेची लगबग सुरू आहे.रविवारी शहर पूर्णपणे लग्नघरासारखेच सजून तयार झाले. 20 देशांतील सर्वंच पाहुणे हॉटेल मेरियटमध्ये दाखल झाले.त्यांचे जोरदार स्वागत झाले. या हॉटेलमध्ये आलेले पर्यटकही जी-20 च्या लोगोसमोर फोटोसेशन करीत होते. या संपूर्ण परिसरात कडक सुरक्षाव्यवस्था असून, ओळखपत्राशिवाय कोणालाही आता सोडले जात नव्हते. विद्यापीठ परिसरातही गेटवरच कडक सुरक्षा असून, कोणालाही आत जाण्यास परवानगी नाही.

जी 20 लोगो अन् एक क्लिक
हॉटेल जे डब्ल्यू मेरियटमध्ये जी-20 असलेल्या लोगोला पाहून प्रत्येक जण त्याच्या बाजूला उभे राहून मोबाईलमध्ये एक क्लिक घेण्यापासून स्वतःला रोखू शकत नव्हता. लोगोच्या बाजूला उभे राहून एक क्लिक घेण्यासाठी रांगा लागत असल्याचे चित्र दिसून आले.

महापालिकेचे सादरीकरण..
पुणे शहराचा झालेला विस्तार. शहरालगतच्या गावांचे झालेले शहरीकरण याबाबत पुणे महापालिकेच्या वतीने या परिषदेत विस्तृत सादरीकरण जी-20 च्या प्रतिनिधींसमोर केले जाणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय अर्थ विभागाचे सहसचिव सालोमन आरोकीरज यांनी दिली.

पुणेरी पगडी घालून स्वागत..
आगमन झालेल्या प्रतिनिधींमधे जी-20 समूहाच्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, स्पेन, सिंगापूर, फ्रान्स, जपान, अर्जेंटिना, जर्मनी या सदस्य देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वित्तीय विकास आणि अर्थव्यवस्थेला स्थिरता देण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोएलीशन फॉर डिझास्टर रेझीलीयंट इन्फ्रास्ट्रक्चर, इंटरनॅशनल फायनान्स कार्पोरेशन, युरोपियन युनियन, एशिअन डेव्हलपमेंट बँक या जागतिक संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. या प्रतिनिधींचे पुणेरी पगडी घालून आणि शाल देऊन तसेच ढोलताशाच्या गजरात, तुतारीच्या निनादात पारंपरिक पद्धतीने प्रशासनाच्यावतीने स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, पुणे महानगरपालिका उपायुक्त किशोरी शिंदे, विमानतळ संचालक संतोष ढोके, सहायक संचालक संजय दुलारे उपस्थित होते.

परिषदेत सायकलची चर्चा…
हॉटेलच्या दर्शनी भागापासून ते सर्व मजले सुंदर फुलांनी सजविण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावर चर्चासत्राचे विविध सात दालने तयार करण्यात आली आहेत. यात मेडिटेशन हॉलदेखील ठेवण्यात आला आहे. हॉटेलच्या लॉबीमध्ये चहाचा आस्वाद घेताना लक्ष वेधून घेते ती तांब्याचा मुलामा असलेली कोरी करकरीत सायकल. येणारा प्रत्येक जण सायकलला हात लावून तिच्यासोबत फोटो घेण्यात रमताना दिसतोय.

पाहुण्यांचे ‘नमस्ते इंडिया’…
जी-20 परिषदेसाठी आगमन झालेल्या प्रतिनिधींचे खास महाराष्ट्रीय संस्कृतीने स्वागत करताना त्यामागचा हेतू राजशिष्टाचार अधिकारी यांनी विषद केला असता, स्वागताने भारावलेल्या प्रतिनिधींनी उत्साहात आणि मोठ्या आवाजात ’नमस्ते इंडिया’ प्रतिसाद देऊन आपला आनंद व्यक्त केला.

पाहुण्यांना पुणे दर्शन…
आलेल्या सर्वच पाहुण्यांसाठी ‘पुणे दर्शन’ची खास सोय करण्यात आली असून, त्यांच्यासाठी शहर व जिल्ह्यातील कोणत्याही पर्यटनस्थळी जाण्याची व्यवस्था क?ण्यात आली आहे. शहरातील विविध वारसास्थळे तसेच महाबळेश्वर येथेही जाण्याची सोय करण्यात आली असल्याचे दिल्लीहून आलेल्या अधिका-यांनी सांगितले.

Back to top button