पिंपळे गुरव येथील स्वच्छतागृह उद्घाटनाच्या प्रतीक्षेत | पुढारी

पिंपळे गुरव येथील स्वच्छतागृह उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

नवी सांगवी : पुढारी वृत्त्तसेवा :  पिंपळे गुरव येथे पिंपरी चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटीअंतर्गत शाळा क्रमांक 54 व काळुराम जगताप जलतरण तलावाशेजारी नव्याने उभारण्यात आलेले स्वच्छतागृह अनेक महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. परिसरातील नागरिकांना स्वच्छतागृहाची सोय व्हावी, यासाठी संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर हे स्वच्छतागृह सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासन मात्र, उद्घाटन करण्याच्या प्रतीक्षेत आहे.

महापालिकेकडून व स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील नागरिकांसाठी सार्वजनिक सोयीसुविधा पुरविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. पिंपळे गुरव, नवी सांगवी येथे स्मार्ट सिटीच्या कामाचे नियोजन परिपूर्ण झाले असले तरी चार महिन्यांपासून तयार असलेल्या स्वच्छतागृहाकडे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. या परिसरात दोन नवीन स्वच्छतागृहे उभारली आहेत. मात्र, ही स्वच्छतागृहे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत.

पिंपळे गुरव येथील कृष्णा चौक, काटेपुरम चौक, रामकृष्ण चौक, साई चौकातील भाजी मंडई येथे असणार्‍या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी वर्दळ असते. बाजारात येणार्‍यांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याने मोठी अडचण होत आहे. जवळपास दोन ते अडीच किलोमीटरच्या परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्यामुळे लोक उघड्यावर लघुशंका करतात. यामुळे अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरते. या मूलभूत सुविधेकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांची कुचंबणा होत आहे.

Back to top button