3400 रु. भाव देऊन ‘माळेगाव’चा इतिहास बदलला : रंजनकाका तावरे | पुढारी

3400 रु. भाव देऊन ‘माळेगाव’चा इतिहास बदलला : रंजनकाका तावरे

माळेगाव; पुढारी वृत्तसेवा : माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा कारभार पारदर्शक करून सहकारतज्ज्ञ चंद्रराव तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी सभासदांना 3400 रुपये भाव देवून कारखान्याचा इतिहास बदलला आहे. आगामी काळात गुजरातचा पॅटर्न राबवत उसाला भाव देणार असल्याचा संकल्प कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी व्यक्त केला. माळेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने रंजनकाका तावरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी तावरे बोलत होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन पैठणकर, उपाध्यक्ष अभिजीत तावरे, सोसायटीचे माजी अध्यक्ष मनोजराव सस्ते यांच्या हस्ते रंजनकाका तावरे यांचा सत्कार करण्यात. भाजपचे सरचिटणीस प्रमोद तावरे, संचालक निशिगंध तावरे, संपत दामाजी लोणकर, प्रमोद जाधव, रमेश रामचंद्र नलवडे, शशिकांत तावरे, गौरव गजानन निंबाळकर व सर्व संचालक, सचिव अशोक पवार, सहसचिव विकास तावरे, आदित्य तावरे, आवूराजे भोसले यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.

माळेगाव कारखान्याची 2020 ची निवडणूक केवळ सत्तेचा गैरवापर केल्यामुळे विरोधकांना जिंकता आली, असा आरोप करत सत्तेशिवाय निवडणूक जिंकू दाखवा, असा टोला तावरे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला. ते म्हणाले, माझ्या आयुष्यात संघर्षाची प्रेरणा सिंधूताई सपकाळ यांच्याकडून मिळाली. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी महासत्तेच्या विरोधात संघर्ष सुरू केला आहे. माझ्याकडे येणार्‍या लोकांना त्रास झाला असेल. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा, सत्याने हाल होतील पण हार नाही, असा सल्ला शेतकरी सभासदांना रंजनकाका यांनी दिला.

जोपर्यंत जिवात जीव आहे तोपर्यंत सत्याची लढाई सुरू राहणार असून, शेतकर्‍यांच्या कष्टाचे दाम त्यांना मिळाले पाहिजे. भविष्यात माळेगावचा 3400 भाव मोडून गुजरातच्या दिशेने नेण्याचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. माळेगाव विकास सोसायटीचा कारभार पारदर्शकपणे करून सोयायटीची वाटचाल सुरू असल्याचा आढावा अध्यक्ष सचिन पैठणकर व उपाध्यक्ष अभिजीत तावरे यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रमोद जाधव यांनी केले, तर प्रवीण वाघमोडे यांनी आभार मानले.

Back to top button