राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे उद्योग राज्याबाहेर; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची टीका | पुढारी

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे उद्योग राज्याबाहेर; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची टीका

शिरूर; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारकडे विकासाचे कुठलेही धोरण नाही. मोठमोठे उद्योगधंदे परराज्यांत जात असताना हे सरकार मूग गिळून गप्प होते. शिरूर तालुक्यात ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर‘दिल्याचा डंका जरी हे सरकार वाजवत असले, तरी हा उद्योग अत्यंत छोटा आहे. बाहेरील राज्यात गेलेले फॉक्सकोन, वेदांता या प्रकल्पांत लाखोंना रोजगार देण्याची क्षमता होती. सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा उद्योग बाहेर राज्यांत गेल्याची घणघणाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

रांजणगाव गणपती (ता.शिरूर) ग्रामपंचायतीने अडीच कोटी रुपये खर्चून बांधलेल्या ग्रामसचिवालयाचे तसेच 11 कोटी 19 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 13) अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अशोक पवार, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, माजी आमदार पोपटराव गावडे, कात्रज दूध संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार, घोडगंगाचे संचालक आबासाहेब पाचुंदकर, रांजणगावचे माजी सरपंच भिमाजी खेडकर, देवस्थानचे माजी अध्यक्ष दत्तोबा लांडे, सरपंच सर्जेराव खेडकर, उपसरपंच स्वाती शेळके, श्रीकांत पाचुंदकर, प्रा.माणिक खेडकर, शिरूर आंबेगाव राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर, सविता बगाटे, ग्रामसेवक गंगाधर देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळे शिरूर तालुक्याचा कायापालट झाला. दुष्काळी अशी ओळख असलेल्या रांजणगाव गणपती परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झाले. त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला. भविष्याचा विचार करून विकासकामे करणे गरजेचे आहे. पदाधिकार्‍यांनी बांधलेली इमारत चांगली असली, तरी या ठिकाणी येणार्‍या नागरिकांची अडचण सोडविली गेली पाहिजे. लोकाभिमुख कारभार करा. कोणावरही अन्याय होऊ देऊ नका. लोकांच्या विश्वासाला पात्र राहून काम करा, असा सल्ला त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांना दिला.

दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, रांजणगाव गणपती गावची लोकसंख्या पाहता घनकचरा व ड्रेनेज व्यवस्थापन यांसह विविध प्रश्न सोडविण्याकडे ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे. आमदार अशोक पवार यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य अजय गलांडे यांनी केले. स्वागत सरपंच सर्जेराव खेडकर यांनी केले. सूत्रसंचालन नीलेश पडवळ यांनी केले. माजी पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर यांनी आभार मानले.

….यांच्या नाकाला झोंबत
अजित पवार यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. कोरोनाकाळात आम्ही कुठेही कमी पडलो नाही. या काळात एसटी कामगारांना वार्‍यावर सोडले नाही. त्यावेळी एसटी कर्मचार्‍यांच्या बाजूने आंदोलन करणारे आज कुठे गेले ? कामगारांच्या पगाराबाबत ते आवाज का उठवत नाही. पालकमंत्री बघू, करू असे म्हणतात. सरकारमध्ये कोणालाही विकासकामांकडे पाहायला वेळ नाही. 40 खोके एकदम ओके म्हणलं की यांच्या नाकाला झोंबते. फोडाफोडीचे राजकारण यातच या सरकारचा वेळ जात आहे. पुणे जिल्हा परिषदेने 1 हजार कोटींची कामे केली. अष्टविनायक तीर्थक्षेत्र दर्शन घडविण्यासाठी रस्ते विकास केला, असे त्यांनी सांगितले.

Back to top button