

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामतीला माहेरी आलेली महिला घराकडे जाण्यासाठी बारामती बसस्थानकावर एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत त्यांच्याकडील 73 हजार रुपयांचे दागिने एका महिलेने लंपास केले. या प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. राजश्री रवींद्र स्वामी (रा. गोंदवले, ता. माण, जि. सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली. गुरुवारी (दि. 12) दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला.
स्वामी या त्यांचे बंधू मल्लिकार्जुन हिरेमठ यांच्याकडे बारामती येथे आल्या होत्या. येथून गोंदवलेकडे जाण्यासाठी त्या भावासह बारामती बसस्थानकात पोहोचल्या. तेथे बारामती-फलटण एसटी बसमध्ये त्या चढत असताना पाठीमागे असणार्या काळ्यासावळ्या रंगाच्या, पिवळी साडी नेसलेल्या महिलेने त्यांची पर्स खेचली. फिर्यादी गर्दीतून दाटीवाटीने बसमध्ये चढल्या असता त्यांना पर्सची चेन उघडी दिसली. त्यांनी पाहणी केली असता पर्समधून दोन हजार रुपये रोख, 35 हजार रुपयांचा लक्ष्मीहार, 35 हजार रुपयांचे गंठण, चांदीचे दागिने असा 73 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला.