पुणे : ‘त्या’ शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन; अनधिकृत शाळांवर कारवाई अटळ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : इंग्रजी माध्यमाच्या अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळांवर गुन्हे दाखल होणार आहेत. तसा आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने अधिकार्यांना दिला आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन केले जाणार असून, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येदेखील विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी दिली.
राज्य सरकारची मान्यता नसतानाही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू असल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर शिक्षणाधिकार्यांनी गटविकास अधिकार्यांना अनधिकृतपणे सुरू असलेल्या तेरा शाळांवर थेट गुन्हाच दाखल करण्याचा आदेश दिला. या शाळांवर कारवाई केल्यानंतर येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांना इतर शाळेत तत्काळ समायोजित करण्यात येणार आहे. परिणामी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नसल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, इंग्रजी शाळांच्या मनमानीला चाप बसविण्यासाठी अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी जिल्हा परिषदेने हे पाऊल उचलले आहे. गटशिक्षणाधिकार्यांनी शाळा तपासणीच्या दिलेल्या अहवालाच्या आधारे पुणे जिल्ह्यातील 13 शाळा अनधिकृतपणे कार्यरत आहेत. त्या शाळांना राज्य सरकारची अद्याप परवानगी नाही. तरीही या शाळांनी वर्ग सुरू ठेवले आहेत त्या शाळांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
शाळेला शुल्क द्यावे लागणार परत…
इंग्रजी माध्यमाच्या शाळा पाल्यांच्या शिक्षणासाठी पालकांकडून भरमसाठ शुल्क आकारतात. याच इंग्रजी माध्यमातील तेरा शाळांवर जिल्हा परिषद कारवाई करणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे इतर शाळांत समायोजन केले जाणार असून, या शाळांना विद्यार्थ्यांचे शुल्क ही परत करावे लागणार असल्याचे शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी सांगितले.