धायरीत हंडाभर पाण्यासाठी चिरीमिरी! | पुढारी

धायरीत हंडाभर पाण्यासाठी चिरीमिरी!

दत्तात्रय नलावडे

खडकवासला : सिंहगड रस्ता भागातील सर्वांत लोकसंख्येच्या धायरी परिसरात वर्षानुवर्षे पाण्याची समस्या कायम आहे. रायकर मळा, अंबाईदरा आदी भागांसह परिसरात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. या भागातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचार्‍यांना चिरीमिरी द्यावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. दरम्यान, याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रशासनाने दखल घेत नागरिकांनी कर्मचार्‍यांना पैसे देऊ नयेत, असे आवाहन केले आहे. पुणे शहरासह नांदेड, हिंगणे वडगाव, सिंहगड रोड परिसरात मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, खडकवासला धरणाजवळील धायरी येथे पाणी समस्या कायम आहे.

धायरी येथील टंचाईग्रस्त भागात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने दोन सरकारी दोन व दोन खासगी, अशा चार टँकरद्वारे दररोज मोफत पन्नास खेपा पाणी दिले जात आहे. ज्या भागात अपुरा पाणीपुरवठा आहे तसेच पाण्याचे नळजोड नाहीत, अशा भागांतील जवळपास सात हजारांहून अधिक लोकसंख्येला मोफत पाणीपुरवठ्याचा लाभ मिळत आहे.

असे असले तरी उंच-सखल भागांतील सोसायट्यांमधील नागरिकांकडून पाणी सोडण्यासाठी तसेच टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी चिरीमिरी घेत असल्याचे नागरिकांनी सांगितले. याकडे ‘आप’चे कार्यकर्ते व माजी उपसरपंच धनंजय बेनकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

दरम्यान, धायरीचा 2017 मध्ये महापालिकेत समावेश करण्यात आला. रायकर मळा, बेनकर वस्ती, अंबाईदरा आदी भागांचा विस्तार झाला आहे. मात्र, अद्यापही नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

नागरिकांची भटकंती
जलशुद्धीकरण प्रकल्प नसल्याने धायरी परिसरामध्ये अनेकदा पाणी गढूळ येत आहे. तसेच अवेळी दुपारी, पहाटे, रात्री पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. नोकरदार, मजुरांसह सामान्य नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

धायरी परिसरात अपुरा पाणीपुरवठा असलेल्या व पाणीजोड नसलेल्या भागांत टँकरने मोफत पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी कर्मचार्‍यांना नागरिकांनी पैसे देऊ नये. असे प्रकार होत असल्यास तातडीने नागरिकांनी तक्रार दाखल करावी. दोषी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येईल.
                                              – हनुमंत गावडे, शाखा अभियंता,
                                               स्वारगेट पाणीपुरवठा विभाग.

टँकरसाठी दर वर्षी महापालिका लाखो रुपये खर्च करत आहे. पाणी मोफत असले, तरी सोसायटींना चिरीमिरी द्यावी लागते. उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर होते. त्यामुळे प्रशासनाने आताच नियोजन करावे.
                                                           – धनंजय बेनकर,
                                                     माजी उपसरपंच, धायरी.

 

Back to top button