पद्मावती पंपिंग स्टेशनला सुरळीतपणे वीजपुरवठा करा; राष्ट्रवादीची महावितरणकडे मागणी | पुढारी

पद्मावती पंपिंग स्टेशनला सुरळीतपणे वीजपुरवठा करा; राष्ट्रवादीची महावितरणकडे मागणी

महर्षिनगर : महावितरणकडून होणार्‍या अनियमित वीजपुरवठ्यामुळे पद्मावती पंपिंग स्टेशनमधून होणारा पाणीपुरवठा खंडित होत आहे, यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. या भागात नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी महावितरणने वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.

महावितरणकडून खंडित स्वरूपाचा वीजपुरवठा होत असल्याने या पंपिंग स्टेशनचा पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याची माहिती स्वारगेट पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या भागात सुरळीतपणे पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. यासाठी महावितरणने या पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा खंडित करू नये; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अध्यक्ष संतोष नांगरे, योगेश पवार यांनी दिला आहे.

महर्षिनगर, मुकुंदनगर, मार्केट यार्ड, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी, आंबेडकरनगर या भागांत पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. माजी नगरसेवकांनी ही समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अखंडित वीजपुरवठ्याबाबत पद्मावती विभागाचे राजेश बिजवे म्हणाले, ‘या विभागास स्वारगेट विभागातून वीजपुरवठा केला जातो.’ तर, स्वारगेट महावितरणचे सुनील कुरील यांनी हा भाग त्यांच्या हद्दीत नसल्याचे सांगितले. महावितरणच्या अधिकार्‍यांना पद्मावती पाणीपुरवठा विभाग कोणत्या हद्दीत आहे, हे सांगता आले नाही. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अजित नाईकनवरे यांनी वाहतूक कोंडीत असल्याचे सांगून या समस्येबाबत बोलण्याचे टाळले.

Back to top button