एकाचवेळी दोन पदवी घेण्यात अडचणी; उपाययोजना करण्याचे यूजीसीचे निर्देश | पुढारी

एकाचवेळी दोन पदवी घेण्यात अडचणी; उपाययोजना करण्याचे यूजीसीचे निर्देश

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम करण्यास मुभा दिली आहे. मात्र, उच्च शिक्षण संस्थांकडून विद्यार्थ्यांना स्थलांतर प्रमाणपत्र, शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी आग्रह धरण्यात येत आहे. या प्रमाणपत्रांअभावी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास अडचणी येत असल्याचे यूजीसीच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम करता येण्यासाठीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश यूजीसीने विद्यापीठांना दिले आहेत.

आतापर्यंत विद्यार्थ्यांना दोन पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण एकावेळी घेण्याची परवानगी नव्हती. पूर्णवेळ पदवीचे शिक्षण घेताना पदविका किंवा अर्धवेळ पदवीचे शिक्षण घेता येत होते. मात्र, यूजीसीने अलीकडेच नियमांत बदल करून एकाचवेळी दोन पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम करण्यास मुभा दिली. एकाच वेळी दोन पूर्णवेळाचे पदवी अभ्यासक्रम करताना एक अभ्यासक्रम प्रत्यक्ष, तर दुसरा ऑनलाइन किंवा दूरस्थ असणे आवश्यक आहे. या संदर्भातील मार्गदर्शक सूचना यूजीसीने प्रसिद्ध केल्या आहेत.

तसेच एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रमाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रवेश सुलभतेने होण्यासाठी वैधानिक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश यूजीसीने सप्टेंबरमध्ये विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना दिले होते. विद्यार्थ्यांना एकाचवेळी दोन पदवी अभ्यासक्रम करता यावेत यासाठी उपाययोजना करण्याबाबत यूजीसीच्या वतीने पी. के. ठाकूर यांनी विद्यापीठांना परिपत्रकाद्वारे निर्देश दिले आहेत.

Back to top button