पुणे : जी-20 मधून भविष्य घडविण्याची संधी : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत | पुढारी

पुणे : जी-20 मधून भविष्य घडविण्याची संधी : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘भारताच्या नेतृत्वात जी-20 परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. जी-20 परिषदेच्या माध्यमातून आपले भविष्य घडविण्यासाठी आपल्याला मिळालेली संधी आहे. देशातील तरुण पिढीमुळे भारत जगाचे नेतृत्व करण्यास तयार झाला आहे,’ असे मत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणार्‍या जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी पाटील यांनी संवाद साधला. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर आदी उपस्थित होते.

विद्यापीठाच्या आविष्कार स्पर्धेत सादर करण्यात आलेल्या संशोधन प्रकल्पांना पाटील यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यशस्वी संशोधन प्रकल्पांची उद्योग क्षेत्राशी सांगड घालून स्टार्टअपसाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे या वेळी पाटील यांनी स्पष्ट केले. पाटील यांनी एकूणच जी -20 च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. नवनियुक्त अधिकार मंडळांच्या प्रतिनिधींशी चर्चा देखील केली तसेच स्पर्धेतील परीक्षकांशी देखील संवाद साधला.

Back to top button