पुणे : ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. ठाकूर यांची नियुक्ती | पुढारी

पुणे : ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. ठाकूर यांची नियुक्ती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय ठाकूर यांची ससून सर्वोपचार रुग्णालय आणि बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली आहे. ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची मानसिक आरोग्य संस्थेच्या संचालकपदी बदली करण्यात आली आहे. कोरोना काळात तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची अधिष्ठातापदावरून तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यानंतर उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला. त्यानंतर दीड वर्षापूर्वी ऑगस्ट 2021 मध्ये डॉ. विनायक काळे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला होता.

सोलापूरमधील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना शुक्रवारी 13 जानेवारी रोजी बीजे शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाचा कार्यभार घेण्याचे परिपत्रक काढण्यात आले. विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर यांनी हे आदेश दिले आहेत. डॉ. काळे यांची ससूनच्या अधिष्ठातापदी नेमणूक झाल्यावर दोन-तीन महिन्यांतच ठाकूर यांना पदभार देण्याबाबत चर्चांना उधाण आले होते. तत्पूर्वी, डॉ. चंदनवाले यांच्या काळातही डॉ. ठाकूर यांचे नाव समोर आले होते. शासकीय नियमानुसार एकदा नेमणूक झाल्यानंतर किमान तीन वर्षे बदली केली जात नाही. असे असताना डॉ. काळे यांच्या बदलीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

चंदनवाले गटाला धक्क्का…
वैद्यकीय शिक्षण खात्यात डॉ. अजय चंदनवाले व डॉ. संजीव ठाकूर या दोन गटांमध्ये कायम रस्सीखेच पाहायला मिळाली आहे. डॉ. ठाकूर यांची ससूनच्या अधिष्ठातापदी नियुक्ती झाल्याने डॉ. चंदनवाले गटाला धक्का बसल्याचे मानले जात आहे. डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडे महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचा अतिरिक्त पदभार होता. आता त्या ठिकाणी डॉ. काळे यांची पूर्ण वेळ संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे.

उपअधिष्ठातापदी डॉ. अजय तावरे
डॉ. विनायक काळे यांची बदलीची ऑर्डर येण्याच्या काही तास आधी न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. अजय तावरे यांची उपअधिष्ठातापदावर नियुक्ती झाल्याचे पत्र काढण्यात आले.

Back to top button