पुणे : संक्रांतीसाठी बाजारपेठांमध्ये लगबग; पूजेच्या साहित्यांपासून ते तिळगुळापर्यंतची खरेदी | पुढारी

पुणे : संक्रांतीसाठी बाजारपेठांमध्ये लगबग; पूजेच्या साहित्यांपासून ते तिळगुळापर्यंतची खरेदी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत स्नेह अन् आपुलकी वाढविणारा सण म्हणजे मकर संक्रांत रविवारी (दि. 15) उत्साहात साजरी होणार आहे. यानिमित्त घराघरांमध्ये सणाची तयारी सुरू झाली असून, त्यासाठीच्या खरेदीसाठी शुक्रवारी मंडई, रविवार पेठ, लक्ष्मी रस्ता, तुळशीबागेत लगबग पाहायला मिळाली. शनिवारी (दि. 14) भोगी असल्यामुळे त्यानिमित्तही खरेदीसाठी महिला-तरुणींची गर्दी पाहायला मिळाली अन् पूजेच्या साहित्यांपासून ते तिळगूळ खरेदीपर्यंत, फुलांच्या खरेदीपासून ते सुगड खरेदीपर्यंत महिला-तरुणींनी खरेदीचे निमित्त साधले. खरेदीसह रांगोळी, लहान मुलांच्या बोरन्हाणसाठी लागणारे दागिने आणि हलव्याच्या दागिन्यांचीही खरेदी जोमाने करण्यात आली.

मकर संक्रांत हा महत्त्वपूर्ण सण असून, मोठ्या उत्साहात तो पारंपरिकरीत्या साजरा केला जातो. सणानिमित्त बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग पाहायला मिळते. असाच खरेदीचा उत्साह बाजारपेठांमध्ये शुक्रवारी पाहायला मिळाला. महिला-तरुणींनी सुगड, गाजर, बोरे, उसाची पेरे, शेंगा, कापूस, हरभरे, पाच फळे, तिळगूळ तसेच हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी लागणारे वाण, पूजेचे साहित्य आणि पूजेसाठी लागणार्‍या फुलांची खरेदी केली. त्याशिवाय लहान मुलांसह तरुणांनी रविवार पेठेत पतंग खरेदीचे निमित्त साधले.

तिळाची वडी, तिळाचे लाडू, साखर, गुळाच्या वड्या, तिळाचा हलवा याच्या खरेदीसाठीही दुकानांमध्ये लगबग पाहायला मिळाली तर हलव्याच्या दागिन्यांसह लहान मुलांच्या बोरन्हाणसाठी लागणार्‍या विविध प्रकारच्या दागिन्यांसह रांगोळीची खरेदी करण्यात आली. सायंकाळी चार वाजल्यानंतर बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह अन् चैतन्य पाहायला मिळाले. भोगीसाठीही लोकांनी साहित्यांची खरेदी केली. विक्रेत्या सीमा साळुंके म्हणाल्या की, सुगड आणि पूजेच्या साहित्याच्या खरेदीला संमिश्र प्रतिसाद आहे. पाच सुगडांची किंमत 45 ते 50 रुपये आहे, तर पूजेच्या साहित्याची किंमत 20 रुपयांच्या पुढे आहे.

‘भोगी’मुळे भाज्या कडाडल्या
पुणे : भोगीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी केल्या जाणार्‍या भाजीसाठी वाल पापडी, पापडी, मटार, वांगी, पावटा, गाजर आंदींच्या खरेदीकरिता शुक्रवारी बाजारात गर्दी झाली होती. भाज्यांना मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली. दरम्यान, तयार मिक्स भाज्यांच्या खरेदीकडे गृहिणींचा कल राहिल्याचे भाजीविक्रेते चरण वणवे यांनी सांगितले. भोगीसाठी लागणार्‍या भाज्यांच्या खरेदीसाठी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात शुक्रवारी सकाळपासून किरकोळ खरेदीदारांची गर्दी झाली होती. महात्मा फुले मंडई, नेहरू चौक, गोविंद हलवाई चौक परिसरात भाजीपाला खरेदीसाठी गर्दी झाली होती.

Back to top button