बाजरीचे लाडू, चकली, चिवडा, धपाट्यांवर मारला ताव, तृणधान्यांचे महत्व पटवून देण्यासाठी वर्षभर कार्यक्रम: सुनिल चव्हाण | पुढारी

बाजरीचे लाडू, चकली, चिवडा, धपाट्यांवर मारला ताव, तृणधान्यांचे महत्व पटवून देण्यासाठी वर्षभर कार्यक्रम: सुनिल चव्हाण

पुणे, पुढारी वृत्तसेवा: बाजरी या तृणधान्यापासून बनविण्यात आलेले लाडू, हलवा, बर्फी, वडी, थालिपीठ, शिरा, उपमा, उसळ, पोहे, चिवडा, चकली, धपाटे असे सुमारे 75 प्रकारचे पदार्थांवर ग्राहकांनी ताव मारला. कृषी विभागाने आयोजित केलेल्या प्रदर्शनात जिल्ह्यातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या जिनसांच्या खरेदीने त्यांनाही पाठबळ मिळाले. कृषी विभागाच्यावतीने तृणधान्यांचे आहारातील महत्व नागरिकांना पटवून देण्यासाठी वर्षभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याची घोषणा कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांनी येथे केली.

मध्यवर्ती इमारत आवारात बाजरी या तृणधान्यापासून बनविण्यात येणार्‍या विविध पाककृतींची स्पर्धा व प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (दि.13) सकाळी अकरा वाजता त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील, फलोत्पादन संचालक कैलास मोते, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे तथा आत्माचे संचालक दशरथ तांबाळे, मृदसंधारण संचालक रवींद्र भोसले, कृषि प्रकिया संचालक सुभाष नागरे, कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) दिलीप झेंडे, विस्तार व प्रशिक्षण सह संचालक सुनील बोरकर, स्मार्ट प्रकल्पाचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुभाष काटकर आदी यावेळी उपस्थितीत होते. यावेळी कृषि आयुक्तांनी प्रदर्शनातील 15 स्टॉलला भेटी देऊन पाककृतीविषयी माहिती घेतली.

पौष्टिक तृणधान्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी तसेच तृणधान्यांचा आहारांमध्ये समावेश करण्यासाठी सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्या निमित्ताने राज्य सरकारने ‘मकर संक्रांती-भोगी’ हा दिवस ‘पौष्टिक तृणधान्य दिवस’ म्हणून घोषित केला आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये वातारणीय बदल, आहारात बदल झाल्याने नागरिकांना कर्करोग, मधुमेह, श्वसनाच्या विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. म्हणून नागरिकांनी आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर करावा. शेतकर्‍यांनी पारपांरिक शेतीकडे वळण्याची गरज आहे. या सर्व बाबींचा विचार करता राज्यातील नागरिकांनी तृणधान्य दिवस साजरा करण्याचे आवाहनही आयुक्त चव्हाण यांनी केले.

Back to top button