पुणे : रॅपिडो बाईक-टॅक्सी बंद झाल्याबद्दल रिक्षाचालकांनी केला जल्लोष साजरा | पुढारी

पुणे : रॅपिडो बाईक-टॅक्सी बंद झाल्याबद्दल रिक्षाचालकांनी केला जल्लोष साजरा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  बाईक टॅक्सी बंद झाली, रिक्षा चालक कृती समितीचा विजय असो, सत्य परेशान होता है, लेकीन हार नही पाता है, अशी जोरदार घोषणाबाजी करत आणि फटाके वाजवत रिक्षा चालकांनी बाईक टॅक्सी बंद झाल्याबद्दल शनिवारी पुण्यात जल्लोष केला. शनिवारी दुपारी मुंबई उच्च न्यायालयाने पुढील सुनावणी होईपर्यंत सरसकट बाईक टॅक्सी बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर रॅपिडो बाईक टॅक्सी ऑनलाइन ॲपवर बंद झाल्या.

त्यामुळे न्यायालयाचे आभार मानण्यासाठी आणि आनंद व्यक्त करण्यासाठी रिक्षाचालकांनी शनिवारी नवी पेठ येथील पत्रकार भवन जवळ फटाके वाजवून आणि जोरदार घोषणाबाजी करून आनंद साजरा केला. यावेळी रिक्षा चालक-मालक कृती समितीतील पदाधिकारी आणि रिक्षाचालक उपस्थित होते. यावेळी बघतोय रिक्षावाला संघटनेचे डॉ. केशव क्षीरसागर म्हणाले, पैशाच्या जोरावर बेकायदेशीररित्या बाईक टॅक्सी चालवून रिक्षा चालकांच्या पोटावर या कंपन्या पाय देत होत्या, यासाठी आम्ही बऱ्याच दिवसापासून लढा दिला. पोलिसांच्या लाट्याकाट्या खाल्ल्या. आम्हाला अटक झाली. अखेर आम्ही दिलेल्या लढ्यानंतर हे यश आम्हाला मिळाले आहे, आम्ही न्यायालयाचे आभार मानतो.

Back to top button