चाकण येथे शॉर्टसर्किटने आग; घर भस्मसात | पुढारी

चाकण येथे शॉर्टसर्किटने आग; घर भस्मसात

चाकण; पुढारी वृत्तसेवा : चाकण-रोहकल रस्त्यावर जरे निसर्ग (चाकण, ता. खेड) येथील छत्रपती शिवाजी नगरमध्ये बुधवारी (दि. 11) रात्रीच्या वेळी लागलेल्या आगीत घरातील कौटुंबिक साहित्य जळून खाक झाले. आग लागल्यानंतर तत्काळ स्थानिकांनी घरातील वीजपुरवठा बंद करून घरातील सर्व सदस्यांना सुखरूप बाहेर काढून घरावर जोरदार पाण्याचा मारा केला. मात्र, तोपर्यंत घरातील सर्व साहित्य जळून मोठे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.

रात्री नऊच्या सुमारास अचानक घराला लागलेल्या आगीने काही क्षणात उग्ररूप धारण केले आणि संपूर्ण घराला आगीच्या ज्वाळांनी वेढले. त्यातच धुराचा लोटही निर्माण झाल्याने पुढेही जाता येत नव्हते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ पाण्याची उपलब्धता व पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणली. या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याचे घराचे मालक संतोष लांडगे व आम्रपाली लांडगे यांच्याकडून सांगण्यात आले.

दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या भागात कमी क्षमतेच्या रोहित्रावर अनेक शेतीपंप आणि वेगवेगळ्या वसाहतींना वीजपुरवठा होतो. त्यामुळे वीजपुरवठा कमी-अधिक दाबाने होत असतो. त्यामुळे अनेकदा विजेची उपकरणे नादुरूस्त होतात. त्यातूनच शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली आहे. वीज वितरण कंपनी या आगीस जबाबदार असल्याचेही स्थानिक रहिवाशी संतोष परदेशी, दत्ता परदेशी, मारुती वाघमारे, संतोष लांडगे व आम्रपाली लांडगे यांनी सांगितले.

Back to top button