

कडूस(ता. खेड); पुढारी वृत्तसेवा : आखरवाडी येथे चासकमान धरणाचा उजवा कालवा फुटून या भागातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले होते. संबंधित शेतकर्यांना तात्काळ व योग्य भरपाई मिळावी म्हणून आखरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच मोनिका मुळूक, अॅड अरुण मुळूक, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामसेवक शरद शिरसाट यांच्या सहीने निवेदन जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांना कालवा फुटलेल्या ठिकाणी देण्यात आले.
आखरवाडी येथे चासकमान धरणाचा उजवा कालवा फुटल्याने शेतकर्यांच्या शेतातील उभी पिके पाण्याखाली गेली. शेत- जमीनही वाहून गेली, उभ्या पिकात पाणी साचल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे. आखरवाडी येथे चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यावरून जमिनीखालून सुमारे 1200 एम.एम. व्यासाची जलवाहिनी टाकून उजव्या कालव्याची निर्मीती केली आहे.
शेतकर्यांच्या शेताखालून जवळपास दहा फूट खोल जलवाहिनी नेल्याने त्याचा कोणताही मोबदला शेतकर्यांना मिळालेला नाही. दोन दिवसांपूर्वी या कालव्याला 15 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आल्यावर मंगळवारी (दि. 10) दुपारी ही जलवाहिनी जमिनीखाली फुटल्याने मंजाबापू मुळूक यांच्या शेतातील गव्हाच्या पिकातून पाणी वेगाने जमिनी खालून वर येऊ लागले.
मंजाबापू मुळूक यांचे गव्हाचे पीक, अशोक मुळूक यांचे हरभर्याचे पीक, दगडू मुळूक यांचे ज्वारीचे पीक, तर सोमनाथ मुळूक यांचे पंधरा दिवसांपूर्वी लावलेल्या कांद्याच्या पिकातून खाली असलेल्या ओढ्याच्या पात्रात पाणी वेगाने वाहू लागले. यात शेतकर्यांचे उभे पीक पाण्याखाली गेले, याशिवाय जमीनही मोठ्या प्रमाणात वाहून गेली. सोमनाथ मुळूक यांचे कांद्याचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, मोठा खर्च शेतकर्यांचा वाया गेला.
याबाबत शेतकरी म्हणाले की, यापूर्वीही येथे कालव्याची जलवाहिनी फुटल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले होते. मात्र, भरपाई मिळाली नव्हती, आताही शेतकर्यांचे नुकसान झाल्याने आतातरी भरपाई मिळणार का, असा प्रश्न उद्धिग्न होऊन शेतकर्यांनी विचारला. जलसंपदा विभागाच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यावर उजव्या कालव्याला सोडलेले पाणी बंद करण्यात आल्यावरही जवळपास चार तास मोठ्या प्रमाणात फुटलेल्या ठिकाणातून पाणी बाहेर येत होते.
यावेळी राष्ट्रवादी लिगल सेलचे अध्यक्ष अॅड. अरुण मुळूक, सरपंच मोनिका मुळूक, मंजाबापू मुळूक, समीर मुळूक, अशोक मुळूक, सोमनाथ मुळूक, दिगंबर मुळूक यांसह अन्य शेतकरी उपस्थित होते. त्यांच्याकडून धरणाचे शाखा अभियंता एम. एम. गायकवाड, काळूराम दाते यांनी निवेदन स्वीकारले. शासनाकडे याबाबत कृषी विभागाच्या वतीने पंचनामा पाठविण्यात आला असून, योग्य तो मोबदला शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे यावेळी शेतकर्यांना सांगण्यात आले.