जळगाव सुपेतील जलसंधारण कामाबाबत तक्रार; बोगस कामांच्या चौकशीची ग्रामस्थांची मागणी | पुढारी

जळगाव सुपेतील जलसंधारण कामाबाबत तक्रार; बोगस कामांच्या चौकशीची ग्रामस्थांची मागणी

बारामती; पुढारी वृत्तसेवा : जळगाव सुपे (ता. बारामती) परिसरात मृद व जलसंधारण विभागाने केलेल्या सिमेंट काँक्रीट बंधार्‍याची कामे निकृष्ट झाल्याची तक्रार ग्रामस्थ अमोल जगताप व संदीप खंडाळे यांनी केली आहे. चुकीच्या व बोगस कामांची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी उपमुख्यकार्यकारी अधिकारी व जलसंधारण विभागाकडे निवेदन दिले आहे. जळगाव सुपे परिसरात जवळपास 8 ते 9 सिमेंट बंधार्‍याची कामे झाली आहेत.

मृद व जलसंधारण विभागाने यासाठी करोडो रुपयांचा निधी दिला असून, निकृष्ट कामामुळे हा निधी वाया जाणार आहे. तीन महिन्यांपूर्वी ही बंधार्‍याची कामे झाली असून, निकृष्ट झाल्याची तक्रार प्राप्त होऊनही अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप निवेदनात केला आहे. ठेकेदार व जलसंधारण अभियंता बारामती यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी जगताप व खंडाळे यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याच तालुक्यात दर्जेदार कामे होत नसल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. ठेकेदार आणि अधिकार्‍यांची घनिष्ट मैत्री याला कारणीभूत ठरत आहे. दर्जेदार कामे होण्यासाठी अधिकार्‍यांनी ठेकेदारांना सूचना देण्याची गरज असून, निकृष्ट कामे थांबवत संबंधित ठेकेदारांची बिलेही काढली जाऊ नयेत, अशीच आशा जनता व्यक्त करीत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

Back to top button