शिरूर; पुढारी वृत्तसेवा : रांजणगाव गणपती येथे शुक्रवारी (दि.13) सुमारे अडीच कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नूतन ग्रामपंचायत ग्रामसचिवालय इमारत तसेच 11 कोटी 19 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन होत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहणार आहेत. रांजणगाव गणपती गावचे सरपंच सर्जेराव खेडकर यांनी याबाबत माहिती दिली. पूर्वीची ग्रामपंचायत इमारत फार जुनी झाली होती. त्यामुळे नवीन इमारत बांधण्याचा निर्णय पदाधिकार्यांनी घेतला होता.
त्यानुसार सुमारे दोन कोटी 52 लाख 46 हजार रुपये खर्चून सर्व अद्ययावत सुविधा व भव्य इमारत बांधली आहे. इमारतीचा लोकार्पण सोहळा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आहेत, असे त्यांनी सांगितले.
गावचा वाढता विस्तार लक्षात घेता ग्रामपंचायतीने जि. प. प्राथमिक शाळा गावठाण इमारत, महिला अस्मिता भवन, चर्मकार वस्ती समाज मंदिर, देवाची वाडी स्मशानभूमी, आर. ओ. प्लांट, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजना, बसस्थानक ते भांबर्डे रस्ता, शेरेवस्ती रस्ता, गावठाण स्मशानभूमी आदी सुमारे 11 कोटी 19 लाख 61 हजार 994 रुपये किंमतीच्या विविध विकासकामांचे उद्घाटन होणार आहे.
कार्यक्रमाला माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार अॅड.अशोक पवार, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे, उद्योगपती प्रकाश धरिवाल, जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष केशरताई पवार, भिमाशंकर साखर कारखाना अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांसह तालुक्यातील पदाधिकारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार असल्याचेही खेडकर यांनी सांगितले.